आधी तुम्ही तुमचे वजन कमी करा आणि काँग्रेस पक्षाचे वजन वाढवण्याचा प्रयत्न करा असा खोचक सल्ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरींना दिला. रेणुका चौधरी यांचा खासदार म्हणून कार्यकाळ संपतो आहे. त्यांच्यासह इतरही खासदारांचा कार्यकाळ बुधवारी संपला. त्यावेळी निरोपाचे भाषण करताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हटले, रेणुका चौधरींना मी बऱ्याच कालावधीपासून ओळखतो. त्यांचे वजन आत्ता आहे त्यापेक्षा कमी होते तेव्हापासून त्या मला माहित आहेत.

नायडू यांनी असे म्हटल्यावर रेणुका चौधरींनीही त्यांना प्रत्युत्तर दिले, व्यंकय्या नायडू मला माझे वजन कमी असल्यापासून ओळखतात. माझ्या वाढलेल्या वजनाची त्यांना खूपच चिंता आहे. मात्र जेव्हा तुम्ही राजकारणात येता तेव्हा तुमचे राजकीय वजन जास्तच असले पाहिजे. चौधरी यांनी ही गोष्ट मांडताच व्यंकय्या नायडू चटकन म्हटले मी तुम्हाला गंमतीत सल्ला दिला होता तुम्ही तुमचे वजन कमी करा आणि पक्षाचे वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करा. नायडू यांनी हे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. काँग्रेस पक्षाचे वजन योग्य आहे असे प्रत्युत्तर रेणुका चौधरी यांनी दिले.

रेणुका चौधरी आणि असा काही वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी उभे राहिले आणि बोलत होते. त्याचवेळी रेणुका चौधरी मोठमोठ्याने हसत होत्या. त्यांचे हसणे ऐकल्यावर मला रामायण मालिकेची आठवण येते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. ज्यामुळेही सभागृहात हशा पिकला होता. आता बुधवारी त्यांच्या निरोपाच्या भाषणाची चांगलीच चर्चा झाली. वजन कमी करण्यावरून नायडू यांनी त्यांना सल्ला दिल्याने त्या चांगल्याच संतापल्या होत्या.