कमला हॅरिस यांचा आरोप

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दु:खद घटनांना राजकीय हत्यार बनवले आहे. त्यांच्या अपयशी नेतृत्वाने लोकांचे जीवन आणि त्यांचे रोजगार यांना नुकसान पोहोचवले आहे, असा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी केला.

उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी स्वीकार केल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी डेमोकॅट्रिक पक्षाच्या अधिवेशनात आपले मत मांडले.

ट्रम्प यांच्या अपयशी नेतृत्वाने लोकांचे जीवन आणि त्यांचे रोजगार यांना नुकसान पोहोचवले आहे, म्हणून आता आपल्याला अशा अध्यक्षांची निवड करायची आहे जे वेगळे, चांगले आणि महत्त्वपूर्ण काम करतील. असे राष्ट्राध्यक्ष जे आपल्या सगळ्यांना श्वेत, कृष्णवर्णी, लॅटिन, आशियायी, स्वदेशी लोकांना एकत्र आणतील. उज्ज्वल भविष्य मिळविण्याच्या सामूहिक इच्छाशक्तीसाठी आपण एकत्र येऊ, असे आवाहन हॅरिस यांनी केले.

हॅरिस यांनी जो बायडेन यांना निवडून देण्यासाठी या वेळी आवाहन केले. त्या म्हणाल्या, वंशभेदावर  कोणतेही ‘व्ॉक्सिन’ नाही. आपल्यालाच वंशभेद दूर करायचा आहे. आपल्या पुढील पिढीला त्यापासून दूर ठेवायचे आहे. जो बायडेन आपल्याला सर्वाना एकत्र आणून अर्थव्यवस्था उभी करताना कोणी मागे राहाणार नाही याची काळजी घेतील. तसेच या महासाथीचाही एकित्रतपणे सामना करतील, असा विश्वासही हॅरिस यांनी व्यक्त केला.  हॅरिस यांनी आपल्या आईच्या आठवणीही जागवल्या.

उमेदवारीवर शिक्कामोर्तब

कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी स्वीकार केल्याचे जाहीर केले. अमेरिकेतील प्रमुख राजकीय पक्षाद्वारे अतिशय महत्त्वपूर्ण पदासाठी उमेदवारी मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकी महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय आणि अफ्रिकन अमेरिकनसुद्धा आहेत. ३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत त्या विजयी झाल्यास त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील.  ‘आपण अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी स्वीकारत आहोत, असे जाहीर केले.