एकीकडे भारतीय लष्कराला अत्याधुनिक शस्त्रांसाठी निधी नाहीये तर दुसरीकडे  पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे राफेल विमानांच्या खरेदी करारात ३६ हजार कोटींचे नुकसान झाले असून हा सगळा पैसा केंद्र सरकारच्या खिशात गेला असा खळबळजनक आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात केलेल्या एका ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी हा आरोप केला.

डसॉल्ट अॅव्हिएशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राफेल विमानांच्या खरेदी करारात घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कतारला एक राफेल विमान १३१० कोटी मध्ये विकण्यात येत आहेत. अशात भारताला एका राफेल विमानासाठी १६७० कोटी रूपये चुकवावे लागत आहेत. एवढेच नाही तर यूपीएची सत्ता असताना या एका राफेल विमानाची किंमत ५७० कोटी होती असेही ट्विट राहुल गांधी यांनी केले.

सद्यस्थित केंद्र सरकारला एका विमानाच्या खरेदीवर ११०० कोटी रूपये जास्त किंमत मोजावी लागते आहे. या संपूर्ण करारात ३६ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. हा सगळा निधी मोदी सरकारने आपल्या खिशात घातला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ही रक्कम देशाच्या डिफेन्स बजेटच्या १० टक्के आहे असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

एकीकडे भारतीय लष्कराला शस्त्रांच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध नाही त्यासाठी त्यांना हात पसरावे लागत आहेत आणि दुसरीकडे केंद्र सरकारने राफेल विमानांच्या खरेदी करारात ३६ हजार कोटींचा घोटाळा केला आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेसने वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या विमान खरेदीत नेमका किती रुपयांचा व्यवहार झाला हे केंद्र सरकार स्पष्ट का करत नाही? असा प्रश्न काँग्रेसकडून वारंवार विचारण्यात आला आहे. आता याच खरेदी करारावरून पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली.