News Flash

“भाजपासोबत राहिलो असतो, तर मुख्यमंत्री असतो; काँग्रेसमुळे सगळं संपलं”

कुमारस्वामींनी काँग्रेसवर व्यक्त केला संताप

संग्रहित छायाचित्र

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “भारतीय जनता पार्टीसोबत असतो, तर आतापर्यंत आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. पण काँग्रेससोबत आघाडी करून जे काही कमावलं होतं, ते सगळं संपलं,” असं म्हणत कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.

मैसूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “मी आता सुद्धा मुख्यमंत्री असतो, जर भाजपासोबतचे संबंध चांगले ठेवले असते तर. मी २००६-२००७मध्ये आणि १२ वर्षांच्या काळात जे काही मिळवलं होतं. मी ते सगळं काँग्रेससोबत आघाडी करून संपवून टाकलं,” असं कुमारस्वामी म्हणाले.

“मी २००६-०७मध्ये मुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील जनतेचा विश्वास संपादित केला होता. तो विश्वास पुढचे १२ वर्षे टिकवून ठेवला. पण, काँग्रेसची साथ पकडल्यानंतर सगळं काही गमावून टाकलं. २०१८मध्ये काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर सिद्धारामैय्या आणि त्यांच्या समर्थक गटाने माझी प्रतिष्ठा संपवून टाकली. मी फक्त त्यांच्या जाळ्यात फसत गेलो, कारण देवेगौडा यांच्यामुळे आघाडीसाठी सहमत होते,” असं कुमारस्वामी म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी २०१८मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस व जनता दल सेक्युलरने एकत्र येऊन कर्नाटकात सरकार स्थापन केलं होतं. यावेळी एच.डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली होती.

काही महिने सरकार चालवल्यानंतर दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. पण, या निवडणुकीनंतर काँग्रेस व जेडीएस यांच्यातील आघाडीत मतभेद निर्माण झाले. काही आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 11:21 am

Web Title: lost goodwill of people by joining hands with congress hd kumaraswamy bmh 90
Next Stories
1 अमेरिकेत डीएसीए पुन्हा लागू; न्यायालयाचा आदेश
2 आंदोलन दडपणे चुकीचे : संयुक्त राष्ट्रे
3 ‘सीरम’प्रमुख पूनावाला ‘एशियन ऑफ दी इयर’
Just Now!
X