भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी जागतिक महिलादिनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. महिलांना आंमली पदार्थाच्या नशेत आंदोलन करण्यास भाग पाडलं जात आहे, असं वादग्रस्त वक्तव्य घोष यांनी केलं आहे.

“मागील काही दिवसांपासून घातक आंदोलने होताना दिसत आहेत. महिलांना आंमली पदार्थ देऊन आंदोलन करण्यास भाग पाडलं जात आहे. त्यामुळेच महिला दिवसभर घोषणा देताना दिसत आहेत. महिला आपली संस्कृती विसरल्या आहेत हेच यामधून दिसून येत आहे. चांगलं काय वाईट काय याचं भान महिलांना राहिलेलं नाही,” अशी टीका घोष यांनी आंदोलनकर्त्या महिलांसंदर्भात बोलताना केली आहे. रबिंद्र भारती विद्यापिठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये घोष यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. मी कोण्या एका व्यक्तीला दोष देत नसून संपूर्ण समाजाचा स्तर खालावला आहे, असंही घोष यावेळेस बोलताना म्हणाले. “तरुण मुली ज्या अयोग्य पद्धतीने वागत आहेत, आंदोलने करत आहेत ते चुकीचं आहे. मी कोणाला दोष देत नाहीय. तर समाज म्हणून आपला स्तर खालावला आहे,” असं घोष म्हणाले.

घोष यांच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्याचे शहरविकास मंत्री फिरहाद हकीम यांनी आक्षेप घेतला आहे. महिला दिनाच्या दिवशीच घोष यांनी पश्चिम बंगालमधील महिलांचा अपमान केल्याचे मत हकीम यांनी नोंदवलं आहे. “समाजाने घोष यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. काही घटनांमुळे त्यांनी महिलांचा अपमान करणे योग्य नाही. हे वक्तव्य करताना ते स्वत: अंमली पदार्थांच्या नशेत होते की काय ठाऊक नाही,” असा टोला हकीम यांनी लगावला आहे.