करोना महामारीमुळे लोकांची मनस्थिती नाजूक झालेली असल्याने तिची काळजी म्हणून मणिपूरमधल्या इम्फालमधल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नवे निर्देश काढले आहेत. त्यानुसार, आता अँब्युलन्सचा सायरन, ट्रॅफिक नियंत्रणासाठी वापरले जाणारे सायरन यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. तर लाऊडस्पीकर लावण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. या वेळेतच पण कमी आवाजात लाऊडस्पीकर लावता येणार आहे.

मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फालच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, लिखित परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावण्यासाठी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ ही वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. १८ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशांमध्ये अनावश्यक लाऊडस्पीकर लावणे त्रासदायक असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्याच्या महामारीच्या काळात अनेक सेवाभावी संस्था किंवा अन्य लोक विनाकारण, विनापरवाना लाऊडस्पीकरचा वापर करत आहेत. याचा लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मणिपूर सरकारने सर्व प्रमुख वैद्यकीय अधिकारी, खासगी रुग्णालयं, रुग्णवाहिका पुरवणाऱ्या एजन्सी या सर्वांना रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाजही बंद करावा असे आदेश दिले आहेत. सरकारचं म्हणणं आहे की या सायरनमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे.
या आदेशात म्हटलं आहे की, करोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रस्त्यावर कमी गर्दी आहे. अशावेळी सायरनची आवश्यकता नाही. जर गर्दीमुळे रस्ता बंद असेल तरच केवळ या सायरनचा वापर करावा.

मणिपूरमध्येही करोनाच्या प्रादुर्भावाचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये २८ मेपर्यंत संचारबंदी लागू कऱण्यात आली आहे. मणिपूरमध्ये काल म्हणजे मंगळवारी ६२४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर २० बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातली करोनाबाधितांची संख्या आता ४० हजार ६८३ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत राज्यात ६१२ मृत्यू झाले आहे.