सध्या देशात लव्ह जिहाद हा प्रेमाला धर्म-जातींच्या विषारी प्रचारात बंदिस्त करणारा शब्द परवलीचा बनला असतानाच दुसरीकडे दिल्लीतील ‘लव्ह कमांडोज’ ही स्वयंसेवी संस्था प्रेमी युगुलांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. विवाहाच्या वयात बसणाऱ्या पण प्रेमात गुरफटलेल्या युगुलांना एकत्र आणण्याचे व त्यांना संरक्षण देण्याचे काम आम्ही करत आहोत, असा दावा लव्ह कमांडोज या संस्थेने केला आहे.
लव्ह कमांडोज या संस्थेचे अध्यक्ष संजॉय सचदेव यांनी सांगितले, की प्रेमी युगुले मग ती कुठल्याही जाती-धर्माची असोत, त्यांना आम्ही एकत्र नांदण्यासाठी मदत करतो. लव्ह कमांडोज ही दिल्लीतील पहाडगंज भागातील एक स्वयंसेवी संस्था असून प्रेमी युगुलांना त्यांचे आईवडील, कुटुंबीय, पोलिस यांच्याकडून होणाऱ्या त्रासातून वाचवण्याचे काम ही संस्था करते, त्यांना आश्रय देते. त्यामुळे ते मुक्तपणे विवाहबंधनात प्रवेश करू शकतात.
सचदेव यांनी सांगितले, की आमची संस्था जुलै २०१० मध्ये चालू झाली, त्या वेळी एका मुलावर मुलीच्या कुटुंबीयांनी चुकीचे आरोप केले होते व पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. आमची लढाई ही प्रेमिकांसाठी आहे, त्यांना आम्ही आश्रय देतो. अनेक प्रेमिकांवर पोलिसात गुन्हे दाखल होतात. त्यांनाही आम्ही मदत करतो पण समाजातील काही लोकांचा आमच्या कार्याला विरोध आहे असे सचदेव यांनी सांगितले.
आमचे दोन हेल्पलाइन क्रमांक असून १२ शहरांत आम्ही काम करतो, ज्या विनंती कॉलमध्ये तथ्य असेल, तेथे आम्ही मदत करतो. दिल्लीत व इतर शहरातही आम्ही अशा प्रेमी युगुलांना आसरा देतो पण त्यासाठी आम्ही सरकारकडे मदत मागितलेली नाही, पण आम्हाला टेनिसपटू बिजोर्न बोर्ग याने दोनदा देणगी दिली होती. अनेकदा संमतीने काही मुले मुलींबरोबर एकत्र येतात, तेव्हा कुटुंबीय मात्र त्यांच्यावर अपहरण व बलात्काराचे गुन्हे दाखल करतात हे अन्याकारक आहे कारण पोलिस त्याची शहानिशाही करीत नाहीत. भारतात जाती व  धर्माचा पगडा असल्याने प्रेमविवाहांना विरोध होतो असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागाच्या राजवंत कौर यांनी सांगितले.
 सर्वोच्च न्यायालयातील वकील देवश्री सैकिया यांनी सांगितले, की विवाह ही व्यक्तिगत बाब आहे व राज्यघटनेने आपल्याला अनुशेष १९ अन्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, अनुशेष २१ अन्वये जगण्याचा अधिकार दिला आहे, त्याचा अर्थ केवळ कसेतरी जगणे असा नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे.