कोरोना व्हायरसची दहशत चीनमध्ये तर आहेच. भारतातही ती पसरते आहे. चीनमध्ये या आजारामुळे आत्तापर्यंत ३०० जणांचा जीव गेला आहे. तर १० हजारांपेक्षा जास्त जणांना याची लागण झाली आहे. अशा सगळ्या वातावरणात, कोरोना व्हायरसचा विळखा असतानाही इतकं भीतीचं वातावरण असतानाही एक प्रेमकहाणी फुलली आहे. होय तुम्ही बरोबर वाचलंत. एक चायनीज स्त्री आणि भारतीय पुरुष या दोघांचीही ही प्रेमकहाणी आहे. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये या दोघांनी रविवारी लग्न केलं.

कोरोना व्हायरस चर्चेत आला नसता तर या दोघांचं लग्न ही एक सामान्य घटना होती. मात्र कोरोना व्हायरसा विळखा पडलेला असतानाही या दोघांनी लग्न केलं ही बाब विशेषच म्हणावी लागेल. झिहाओ वँग आणि सत्यार्थ मिश्रा या दोघांचं लग्न मध्य प्रदेशात पार पडलं. हे दोघे पाच वर्षांपूर्वी कॅनडामध्ये भेटले होते. तिथेच त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका त्यांनी घेतल्या तेव्हा कोरोना व्हायरस नावाचा काहीतरी व्हायरस पुढे येईल आणि त्यामुळे आपलं लग्नही चर्चेचा विषय ठरेल हे त्यांना वाटलंही नव्हतं. मात्र सध्या हे लग्न चर्चेचा विषय ठरलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

झिहाओचे वडील शिबो वँग, आई झिन गुआन आणि तिच्या घरातले आणखी दोघेजण या लग्नाला उपस्थित होते. माझ्या पत्नीचे इतर नातेवाईक चीनहून आम्हाला भेटण्यासाठी येणार होते. मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांना भारतात येण्याचा व्हिसा मिळाला नाही अशी माहिती सत्यार्थ मिश्रा यांनी दिली. तर इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांना आम्ही सहकार्य करतो आहोत. चीनमध्ये आम्ही ज्या शहरात राहतो त्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही. मात्र भारतात लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे ती ते घेत आहेत असं झिहाओचे वडील शिबो यांनी म्हटलं आहे.

मंदसौर येथील जिल्हा रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणारे डॉ. ए. के. मिश्रा म्हणाले की, ” आम्ही झिहाओच्या कुटुंबीयांची तपासणी केली. पाच डॉक्टरांनी त्यांना तपासलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची कोणतीही लक्षणं त्यांच्यामध्ये नाहीत. जर आम्हाला त्यांच्यात अशी काही लक्षणं आढळली किंवा तसा संशयही वाटला तर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेऊ. ” मंदसौरमध्ये पार पडलेल्या या लग्नाची चर्चा चांगलीच रंगली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना चायनीज वधू आणि भारतीय वर लग्न बंधनात अडकले आहेत. एकमेकांना कहो ना प्यार है! असं ते म्हणालेच असतील. आता ते लग्नबंधनात अडकले आहेत.