नवी दिल्ली : भारतात कोविड १९ साथीतील मृत्युदर हा हळूहळू कमी होत असून सध्याचा २.४९ टक्के हा मृत्यूदर जगातील सर्वात कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी म्हटले आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांचे योग्य व्यवस्थापन केल्यानेच हे यश मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

देशातील २९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत कोविड १९ मृत्युदर हा देशाच्या सरासरी मृत्यू दरापेक्षाही कमी असून पाच राज्यांत तो शून्य आहे, तर १४ राज्यांत एक टक्क्य़ांहून कमी आहे.

केंद्र, राज्य व  केंद्रशासित प्रदेशातील रुग्णालयात दाखल रुग्णांच्या व्यवस्थापनामुळे मृत्यू दर आटोक्यात ठेवण्यात यश आले आहे. योग्य प्रतिबंधात्मक उपाय, मोठय़ा प्रमाणात चाचण्या, सर्वंकष व्यवस्थापन यामुळे मृत्युदरात घट झाल्याचे सांगण्यात आले. मृत्युदर हळूहळू कमी होत चालला असून तो सध्या २.४९ टक्के आहे. जगात भारतातील सर्वात कमी मृत्यू दर नोंदवला गेला आहे. एक महिना आधी मृत्यू दर २.८२ टक्के होता, तो १० जुलैला २.७५ टक्के झाला, तर सध्या २.४९ टक्के आहे असे आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे. अनेक राज्यांनी लोकांचे सर्वेक्षण केले असून चाचण्या वाढवल्या आहेत, तसेच सार्वजनिक व खासगी रुग्णालयात पायाभूत सुविधा सज्ज केल्या आहेत. मोबाइल अ‍ॅपमुळे जोखमीच्या लोकांवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. वेळीच रुग्णांचा शोध, वैद्यकीय उपचार यामुळे मृत्यू संख्या कमी होत आहे. आशा कर्मचारी, एनएनएम (सहायक परिचारिका) यांनी स्थलांतरित लोकांची चांगली काळजी घेतली आहे. त्यामुळे सामुदायिक पातळीवर जागरूकता निर्माण होण्यास मदतही झाली आहे. २९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील मृत्युदर हा भारतापेक्षा कमी असून देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने चांगले काम केलेले दिसत आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे.

शून्य आणि कमी मृत्युदर

मणिपूर, नागालँड, सिक्कीम, मिझोराम, अंदमान निकोबार या बेटांवर मृत्यू दर शून्य आहे. देशापेक्षा कमी मृत्युदर असलेली राज्ये  पुढीलप्रमाणे- त्रिपुरा ०.१९ टक्के, आसाम ०.२३ टक्के, केरळ ०.३४ टक्के, ओडिशा ०.५१ टक्के, गोवा ०.६० टक्के, हिमाचल प्रदेश ०.७५ टक्के, बिहार ०.८३ टक्के, तेलंगण ०.९३ टक्के, आंध्र प्रदेश १.३१ टक्के, तामिळनाडू १.४५ टक्के, चंडीगड १.७१ टक्के, राजस्थान १.९४ टक्के, कर्नाटक २.०८ टक्के, उत्तर प्रदेश २.३६ टक्के.