देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात ऑक्सिजन न मिळाल्याने कित्येक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातच परदेशातून भारतात ऑक्सिजन टॅंकर आणण्यात आले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात रुग्णसंख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत देखील राज्यं ऑक्सिजनसाठी केंद्राकडे वारंवार मागणी करताना दिसत आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि ५४ टक्के रुग्णसंख्या असलेल्या पाच राज्यांमध्ये केवळ केंद्राने ४२ टक्के लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, ८ मे पर्यंत केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दररोज १०,००० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. यासोबत राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे. दोन आठवड्यांमध्ये फक्त ऑक्सिजनच्या वाटपामध्ये २२ टक्के वाढ झाली आहे. ११ मे पर्यंत देशात ३७.१५ लाख अॅक्टिव रुग्ण होते त्यापैकी २०.१२ लाख रुग्ण हे केवळ पाच राज्यांमध्ये होते. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये १०,१४० मेट्रिक टन ऑक्सिजन पैकी दरदिवशी ४,३०६ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. ८ मेच्या अहवालानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशसोबत गुजरात आणि मध्यप्रदेशात ५.३२६ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता. ११ मे रोजी या राज्यांमध्ये १६.३६ लाख अॅक्टिव रुग्ण होते. जे एकूण अॅक्टिव रुग्णसंख्येच्या ४४ टक्के होते.

ऑक्सिजन वाटण्याची प्रक्रिया एका सूत्राच्या आधारे निश्चित केली जाते. राज्यातील अॅक्टिव रुग्णांची माहिती मिळताच ऑक्सिजनची मागणीचा अंदाज लावला जातो असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

२७ एप्रिलच्या आकडेवारीनुसार या पाच राज्यांपैकी कर्नाटकला मिळालेल्या ऑक्सिजनमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळाले. ८०२ मेट्रिक टनांवरून ही वाढ १,०१५ मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आली. बाकीच्या चार राज्यांना कोणतीही वाढ देण्यात आली नाही. दिल्ली राज्याने ७०० मेट्रिक टनची मागणी केली असता त्यांना दरदिवशी ५९० मेट्रिक टन ऑक्सिजन देण्यात आला.

दुसऱ्या लाटेमुळे करोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ८ मेच्या आकडेवारीनुसार देशात ५० हजार रुग्ण हे अतिदक्षता विभागात होते, तर १.३७ लाख रुग्ण हे ऑक्सिजन सपोर्टवर होते.