देशात करोनाचा फैलाव मंदावला असून, दैनंदिन रुग्णवाढ आणि करोनाबळींमध्ये मोठी घट होत असल्याचे दिसते. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १३,७८८ रुग्ण आढळले. दिवसभरात १४५ रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन करोनाबळींची आठ महिन्यांतील ही सर्वात कमी संख्या आहे.

या महिन्यात दुसऱ्यांदा करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या १४ हजारांखाली नोंदविण्यात आली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १,०५,७१,७७३ झाली आहे. त्यातील १,०२,११,३४२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्तांचे हे प्रमाण ९६.५९ टक्के आहे. करोनाबळींचे प्रमाण १.४४ टक्के आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २,०८,०१२ आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.९७ टक्के आहे.

देशातील एकूण रुग्णसंख्या एक कोटी पाच लाखांहून अधिक असली तरी सध्या दैनंदिन रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. १२ जानेवारी रोजी देशातील रुग्णसंख्या १२,५४८ इतकी नोंदविण्यात आली होती.

उत्तर प्रदेशात लसीकरणानंतर आरोग्य सेवकाचा मृत्यू

लखनऊ : मोरादाबाद येथील रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचाऱ्याचा करोना प्रतिबंधक लसीकरणानंतर मृत्यू झाला. मात्र, त्याचा लसीकरणाशी संबंध नसून, हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी मात्र लशीमुळेच मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत असल्याचे मोरादाबादचे जिल्हा दंडाधिकारी राकेश सिंह यांनी सांगितले.