नववर्ष २०२० च्या पहिल्याच दिवशी जनतेला महागाईचा डबल झटका बसला आहे. आजपासून विना अनुदानीत असलेले घरगुती गॅस सिलिंडर महाग झाले आहेत तसेच रेल्वे तिकीट दरातही वाढ झाली आहे.

सलग पाच महिने एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली आहे. महानगरांमध्ये गॅसच्या दरात २१.५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर रेल्वेकडून प्रवास दरात १ ते ४ पैसे प्रतिकिलोमीटर पर्यंत वाढ केली आहे. तिकीट दरात वाढ झाल्याचा सर्वाधिक परिणाम हा लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. प्रवासाचे अंतर जेवढे अधिक असेल तेवढाच तिकीटाच दर वाढणार आहे.

देशातील प्रमुख महानगरांमध्ये १४.२ किलोचा इंडेन गॅस २२ रुपयांपर्यंत महागला आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार १४.२ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरसाठी दिल्ली – ७१४ रुपये, कोलकाता- ७४७ रुपये, मुंबई – ६८४.५० रुपये आणि चैन्नईत ७३४ रुपये दर असणार आहे. ऑगस्टपासून घरगुती गॅस जवळपास १४० रुपयांपर्यंत महागला आहे.

डिसेंबरमध्ये १४.२ किलोच्या घरगुती गॅसची किंमत दिल्लीत – ६९५ रुपये, कोलकाता -७२५.५० रुपये, मुंबईत ६६५ रुपये व चैन्नईत ७१४ रुपये होती. ऑगस्ट महिन्यात गॅस सिलिंडर जवळपास ६२ रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र त्यानंतर प्रत्येक महिन्यात गॅसच्या किंमतीत वाढ झालेली आहे.