पाकिस्तानने तब्बल दोन वर्षानंतर नेपाळमधून बेपत्ता झालेले निवृत्त लेफ्टनंट कर्नल हबीब झहीर यांचा मुद्दा उपस्थित केला. हबीब झहीर यांच्या गायब होण्यामागे शत्रूचा हात असू शकतो असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानने थेट भारताचे नाव घेतले नसले तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताकडे इशारा केला आहे. हबीब झहीर एप्रिल २०१७ मध्ये नेपाळमधून बेपत्ता झाले होते.

भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या आणि टि्वटसमध्ये निवृत्त लेफ्टनंट कर्नल हबीब झहीर त्यांच्या ताब्यात असल्याचे म्हटले आहे. कुलभूषण जाधव यांची सुटका केली तर भारत हबीब झहीर यांना पाकिस्तानकडे सोपवेल असे बोलले जाते. त्यासंदर्भात पाकिस्तानी माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका मांडली. हबीब झहीर यांच्या गायब होण्यामागे शत्रूंचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे.

अप्रत्यक्षपणे त्यांनी भारताकडे इशारा केला. पाकिस्तानी लष्कराचे निवृत्त अधिकारी हबीब झहीर एप्रिल २०१७ मध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी नेपाळला गेले होते. तिथूनच ते गायब झाले. हबीब झहीर घरी परतेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने तब्बल दोन वर्षानंतर हा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेऊन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांनी देहदंडाची शिक्षा सुनावली होती. पण आंतरराष्ट्रीय कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली.

जाधव यांना शिक्षा सुनावल्यानंतर एप्रिल २०१७ मध्ये हबीब झहीर यांना नोकरीच्या आमिषाने नेपाळला बोलवून गायब करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. हबीब झहीर लुंबिनीमधून बेपत्ता झाल्याचा आरोप पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केला होता. लुंबिनी हा भाग भारताच्या सीमेजवळ आहे. हबीब यांना शोधून काढण्याची भारताला वारंवार विनंती केली पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले.

नोकरीसाठी हबीब यांनी लिंक्डइन आणि संयुक्त राष्ट्राच्या संकेतस्थळावर सीव्ही पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांना मार्क नावाच्या एका व्यक्तीचा फोन आणि ई-मेला आला. व्हाइस प्रेसिडंट पदासाठी निवड झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांना मुलाखतीसाठी काठमांडूला बोलवण्यात आले. त्यासाठी त्यांना ओमान एअरलाइन्सचे तिकीट पाठवण्यात आले अशी माहिती हबीब यांच्या कुटुंबियांनी दिल्याचे पाकिस्तानने सांगितले.

पाकिस्तानच्या चौकशीतून मार्क नावाच्या व्यक्तीचा यूकेचा फोन नंबर बनावट असल्याचे समोर आले तसेच ज्या वेबसाइटने त्यांच्याशी संपर्क साधला ती भारतातून ऑपरेट झाली होती. काठमांडूला उतरल्यानंतर हबीब लुंबिनी एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. त्यांनी पत्नीला शेवटचा फोन केला. आपला प्रवास सुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी कधीच संपर्क होऊ शकला नाही.