पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ तणाव आहे. दोन्ही देशांचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. सीमेवर निर्माण झालेली ही अस्थिरता कमी करण्यासाठी या आठवडयाच्या अखेरीस शनिवारी भारत आणि चीनच्या लेफ्टनंट जनरलमध्ये बैठक होणार आहे.

पँगॉग टीएसओ तलावाच्या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या वादावादीनंतर महिन्याभराने ही बैठक होत आहे. भारत आणि चीनची नियंत्रण रेषा या तलावाजवळून जाते. या ठिकाणी सीमा हद्दीवरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहेत.

कोण आहेत लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग

या बैठकीत लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग भारतीय लष्कराचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. लेह स्थित १४ कॉर्प्सचे ते कमांडर आहेत. १४ कॉर्प्स भारतीय लष्कराच्या उधमपूर स्थित नॉर्दन कमांडचा भाग आहे. उंचावरील युद्धक्षेत्र, प्रतिकुल वातावरण आणि खडकाळ प्रदेश अशा आव्हानात्मक परिस्थितीत १४ कॉर्प्सचे जवान आपली ड्युटी बजावतात.
मागच्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी १४ कॉर्प्स कमांडची सूत्रे स्वीकारली. त्याआधी त्यांनी भारतीय लष्करात महत्वाच्या पदांवर वेगवेगळया जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी संयुक्त राष्ट्राच्या मिशनच्या माध्यमातून आफ्रिकेतही ड्युटी बजावली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लढाईचा सुद्धा त्यांच्याकडे अनुभव आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग मराठा लाइट इन्फंट्रीचाही भाग होते.