कोलकाता : चीनबरोबरचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा सुरू आहे, त्यात चर्चेच्या प्रत्येक फेरीगणिक दोन्ही देशांतील मतभेद कमी होत आहेत, असे पूर्व विभागाचे लष्करी कमांडर व नियोजित उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी येथे सांगितले.

चीनबरोबरचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा प्रश्न सोडवण्यासाठी कुठलीही कालमर्यादा ठरवणे आताच्या परिस्थितीत कठीण आहे, असे सांगून ते म्हणाले, की दोन्ही देशात चर्चेच्या फे ऱ्या सुरू आहेत व त्यात मतभेद कमी होत असल्याचे चित्र आहे. कदाचित कालांतराने यात सर्व मुद्दे लक्षात घेऊन करारावर औपचारिक स्वाक्षऱ्या होऊ शकतात.

सध्या भारत-चीन यांच्यातील सीमा बोलणी कुठल्या टप्प्यात आहे, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की भारत व चीन यांच्यात चर्चेची २३ किंवा २४ वी फेरी सुरू आहे, पण हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही कालमर्यादा घालणे अवघड आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा प्रश्न जेवढा लवकर सुटेल, तेवढा दोन्ही देशांनी प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करण्यातील अडथळा दूर होईल.

कारगिल हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमानंतर  त्यांनी सांगितले, की जर पश्चिम व उत्तरेकडील शेजारी देशांशी शांतता निर्माण करण्यात यश आले, तर  दोन्ही बाजूंच्या देशांना उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करण्यात मदत होईल.

चीनबरोबरची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यातून जाते. भारत व चीन यांच्यात २०१७ मध्ये डोकलामचा पेच निर्माण झाला होता. पीपल्स लिबरेशन आर्मीने सिक्कीम भागात रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला होता. चिकन्स नेक भागावर त्या वेळी चीनने दावा करण्याचा प्रयत्न केला होता.