मध्यप्रदेशातील पॅसेंजर ट्रेनमधील स्फोटाप्रकरणी आता नवीन खुलासा झाला आहे. संशयित दहशतवाद्यांना पुष्पक एक्सप्रेसमध्ये स्फोट घडवायचा होता. मात्र प्रवाशांची गर्दी आणि सतर्कतेमुळे दहशतवाद्यांना स्फोट घडवता आला नाही अशी तपासातून निष्पन्न झाली आहे.

भोपाळ- उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये ७ मार्चरोजी स्फोट झाला होता. या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी पिंपरियामधून आतीफ मुझफ्पर, सय्यद मीर हुसैन आणि मोहम्मद दानिश यांनाा अटक केली आहे. तर सैफुल्लाह या संशयित दहशतवाद्याचा लखनौमधील चकमकीत खात्मा झाला होता. आयसिस या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या प्रकरणात अटकेत असलेल्या दहशतवाद्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. दहशतवाद्यांना पुष्पक एक्सप्रेसमध्ये स्फोट घडवायचा होता. मात्र दहशतवाद्यांना स्फोटाने भरलेली बॅग गाडीत ठेवता आली नाही. प्रवाशांची गर्दी आणि सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव फसला. आतिफने पुष्पक एक्सप्रेसचे तीन तिकिटही विकत घेतले. पण संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांना स्फोटाने भरलेली सुटकेस ठेवायला जागाच मिळाली नाही अशी कबुली या दहशतवाद्यांनी चौकशी दरम्यान दिली आहे. शेवटी त्यांनी भोपाळला उतरल्यावर पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट घडवण्याचा निर्णय घेतला असे या दहशतवाद्यांनी म्हटले आहे.

पुष्पक एक्सप्रेसमधील हल्ल्याचा डाव फसला तरी आता कोणत्याही परिस्थितीत स्फोट घडवायचाच असा त्या तिघांनी ठरवले होते. भोपाळ- उज्जैन पॅसेंजर ट्रेनमधील शेवटच्या डब्यात त्यांना प्रवेश करण्यात यश आले आणि याचा डब्यात शेवटी स्फोट झाला. या स्फोटात १० जण जखमी झाले होते.  अटक झालेल्या संशयित दहशतवाद्यांनी पाच महिन्यांपूर्वी एका प्राचार्याचीही हत्या केली होती अशी माहिती यापूर्वी समोर आली होती. मित्राकडून आणलेली बंदूक तपासून बघताना झालेल्या गोळीबारात प्राचार्याचा मृत्यू झाला होता असे या दहशतवाद्यांनी सांगितले होते.