भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या निवडणुकांसाठी आठ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाने जाहीर केलेल्या यादीनंतर जातीय समिकरणांच्या आधारे उमेदवार निवडण्यात आल्याची राज्यामध्ये चर्चा आहे. राजकीय विश्लेषकांनीही भाजपाने जातीय समिकरणं संभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. आठपैकी दोन उमेदवार हे क्षत्रिय समाजातील आहेत तर दोन ब्राह्मण उमेदावर देण्यात आल्याने उत्तर प्रदेशमध्ये या चार उमेदवारांबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. सध्या राज्यामध्ये ब्राह्मण व्होट बँकेवरुन सुरु झालेल्या राजकारणाशी या निवडीचा संबंध जोडला जात आहे. मागील बऱ्याच काळापासून विरोधकांनी योगी सरकारवर ब्राह्मणांची उपेक्षा करण्याचा आणि अयोग्य वागणूक देण्याचे आरोप केले होते. एकीकडे भाजपा जातीय समिकरणांचा विचार करुन उमेदवार देत असतानाच दुसरीकडे ही यादी जाहीर झाल्यानंतर भाजापच्या उमेदवाराने ब्राह्मणांसंदर्भात पुन्हा एक वक्तव्य करुन नवीन वादाला तोंड फोडले आहे.

भाजपाचे उमेदवार हरिद्वार दुबे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ब्राह्मणांबद्दल वादग्रस्त व्यक्त केलं आहे. दुबे यांनी ब्राह्मण समाजातीच भाजपाबद्दलची नाजारी हे केवळ नाटक असल्याचं म्हटलं आहे. या गोष्टीला हवा देण्यात आली आहे असंही दुबे यांनी म्हटलं आहे. ब्राह्मणांची भाजपावर कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचा विश्वास दुबे यांनी व्यक्त केला आहे. मात्र हा विश्वास व्यक्त करताना त्यांनी वापरलेल्या भाषेवरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे. “ब्राह्मण ससुर जाएगा कहां,” अशी पहिली प्रतिक्रिया दुबे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. “ब्राह्मण ससुर जाएगा कहां, तुम्हीच सांगा कुठे जाणार ब्राह्मण. भाजपा वगळता कोणी ब्राह्मण सन्मान देत नाही. भाजपा आणि ब्राह्मणांचे एवढे चांगले संबंध आहेत की ते शब्दात मांडता येणार नाही. सर्वांना ठाऊक आहे ब्राह्मण कोणाच्या बाजूने जाणार? उगाच काही लोकं या गोष्टीला हवा देतात. ब्राह्मण भाजपाबरोबरच राहणार,” असं दुबे ब्राह्मणांबद्दल बोलताना म्हणाले.

जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न

भाजपाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना जातीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाने उमेदवारी दिलेल्यांमध्ये अरुण सिंह, नीरज शेख हे दोघे क्षत्रिय, हरिद्वार दुबे आणि सीमा द्विवेदी ब्राह्मण, बी.एल. वर्मा आणि गीता शाक्य मागास वर्ग तर उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी बृजलाल हे एससी कॅटेगरीतून आणि हरदीप सिंह पुरी हे शिख समाजाचे आहेत.

कोण आहेत दुबे?

हरिद्वार दुबे यांनी सीतापुरबरोबरच अयोध्या आणि शाहजहांपुरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक म्हणून काम पाहिलं आहे. ते मूळचे बलियाचे असले तरी मागील अनेक वर्षांपासून आग्रा शहरातील राजकारणामध्ये सक्रीय आहेत. सन १९६९ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटना मंत्री म्हणून दुबे आग्र्याला आले होते. त्यानंतर ते महानगराचे अध्यक्ष झाले. १९८९ साली दुबे यांनी छावनीमधून पहिल्यांदा निवडणूक लढली आणि जिंकली. त्यानंतर ते १९९१ मध्येही जिंकले. त्यांना मंत्रीपदही देण्यात आलं. मात्र वेगवेगळ्या वादांमुळे त्यांना राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. २००५ मध्ये ते खेरागढमधून विधानसभेची पोट निवडणूक लढले. या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. आग्रा-फिरोजाबाद विधान परिषदेच्या निवडणुकीमध्येही त्यांचा पराभव झाला. २०११ मध्ये ते उत्तर प्रदेशचे भाजपा प्रवक्ते तर २०१३ मध्ये राज्य भाजपाचे उपाध्यक्ष होते.