News Flash

होर्डिंगवर मायावतींसोबत फोटो छापल्यास पक्षातून होणार हकालपट्टी, बसपचा नवा नियम

नेते आणि कार्यकर्ते पक्षाध्यक्षा मायावतींच्या फोटोपेक्षा स्वत:चा फोटो मोठ्या आकाराचा छापतात

बसपचा नवा नियम

बहुजन समाजवादी पक्षाने आपल्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकांसंदर्भातील प्रचारासंदर्भात काही नियम आखून दिले आहेत. होर्डिंग, बॅनर्स कशापद्धतीने छापले जावेत यासंदर्भातील नियमच पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी जारी केले आहेत. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार पक्षाचा प्रचार करणाऱ्या होर्डिंगवर किंवा बॅनरवर पक्षाध्यक्षा मायावती यांच्या फोटोबरोबर कोणत्याही नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा फोटो छापल्या संबंधित व्यक्तीची पक्षामधून हकालपट्टी केली जाईल.

बसपाचे आमदार आणि पक्षाने स्थापन केलेल्या मंडळ झोनचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी या नियमांची माहिती लखनौ येथील बैठकीमध्ये दिली. पक्षाच्या जुन्या नेत्यांना हार्डिंगस आणि बॅनरबद्दल पक्षाचे धोरण ठाऊक आहे. मात्र निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी पक्षातील नवीन नेते आणि कार्यकर्ते अति उत्साहामध्ये चुकीच्या पद्धतीने पक्षाचे जाहिरात करतात. अनेकदा होर्डिंगवर स्थानिक नेते आणि कार्यकर्ते महापुरुषांच्या तसेच पक्षाध्यक्षा मायावती यांच्या फोटोपेक्षा स्वत:चा फोटो मोठ्या आकाराचा छापतात. अनेकदा यावरुन पक्षाची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे पक्षाने असले प्रकार थांबवण्यासाठी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेत नियमावलीच जारी केली आहे.

लखनौ येथील बैठकीमध्ये बोलताना आमदार आंबेडकर यांनी, मायावती या पक्षाच्या सर्वोच्च नेता असल्याचे उपस्थित नेत्यांना सांगितले. त्यामुळे त्यांच्या फोटोहून मोठ्या आकाराचा स्वत:चा फोटो छापणे चुकीचे दिसते. यापुढे कोणतेही होर्डिंग किंवा बॅनर छापण्याआधी ते मंडळ अध्यक्षांना दाखवून त्यांच्याकडून परवाणगी घेणे बंधनकारक असणार आहे अशी माहिती आंबेडकर यांनी या बैठकीत दिली. होर्डिंग अथवा बॅनरवर मायावतींच्या फोटो छापल्यास त्याबरोबर कांशीराम यांचा फोटो आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह म्हणजेच हत्तीचा फोटो छापला जावा असं या नियमांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाने एकत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याने दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये योग्य ताळमेळ बसवण्याच्या उद्देशाने बसपाने अनेक मंडळ झोनची स्थापना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 11:14 am

Web Title: lucknow bsp issues guidelines for banner hoardings for lok sabha election
Next Stories
1 कर्जबाजारी अनिल अंबानींच्या कंपनीचे ‘टेक ऑफ’, गुजरात विमानतळाचे 648 कोटींचे कंत्राट मिळाले
2 लखनऊत काश्मिरी विक्रेत्यांना मारहाण, स्थानिकांनी मध्यस्थी करत केली सुटका
3 धक्कादायक ! आपल्यावरील सामूहिक बलात्काराचा व्हिडीओ घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली पीडित महिला
Just Now!
X