लखनऊतील हजरतगंज येथील सरकारी अतिथीगृहाजवळील रस्त्यालगत आयएएस अधिकाऱ्याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. अनुराग तिवारी (वय ३६) असे मृत आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. तिवारी उत्तर प्रदेशातील बहरीच जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असून, कर्नाटक कॅडरमधील २००७ च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी होते. दुर्दैव म्हणजे तिवारी यांचा आजच वाढदिवस होता.

आयएएस अधिकारी तिवारी यांचा सरकारी अतिथीगृहाजवळच संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २००७ च्या कर्नाटक बॅचचे आयएएस अधिकारी तिवारी हे अन्न व नागरी पुरवठा विभागात कार्यरत होते. अनुराग तिवारी मसूरी येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लखनऊत आले होते. हजरतगंज परिसरातील मीराबाई अतिथीगृहात खोली क्रमांक १९ मध्ये ते थांबले होते. काल रात्री ते येथील आर्यन रेस्तराँमध्ये जेवले. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास ते झोपले. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास अतिथीगृहाजवळील रस्त्यालगत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. त्यांची हत्या झाली नसावी, असा प्राथमिक अंदाज लखनऊ पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तिवारी यांचा २००८ मध्ये विवाह झाला होता. महिनाभरानंतर घटस्फोट झाला होता. त्यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रस्त्यावर पडल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला जखम झाली असावी, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शिवाय अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे ते जखमी झाले असावेत, असाही अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असेही डॉक्टरांनी सांगितले.