उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ मेट्रोचे उद्घाटन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली. कालच योगी आदित्यनाथ यांनी (मंगळवारी) लखनऊ मेट्रोचे उद्घाटन केले. त्यानंतर आजपासून मेट्रो रेल्वे सामान्य प्रवाशांसाठी खुली झाली. मात्र, मेट्रोच्या पहिल्याच फेरीच्यावेळी तांत्रिक बिघाड उद्भवला. त्यामुळे मेट्रोत १०० हून प्रवासी तासाभरापेक्षाही अधिक काळ अडकून पडले होते. विशेष म्हणजे या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या प्रवाशांची अवस्था बिकट झाली. तासाभरानंतर प्रवाशांची आपत्कालीन दरवाजातून सुटका करण्यात आली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल लखनऊ मेट्रोला हिरवा कंदील दाखवला. यावेळी राज्यपाल राम नाईकदेखील उपस्थित होते. ट्रान्सपोर्ट नगर ते चारबाग या दरम्यान साडेआठ किलोमीटर अंतरासाठी ही मेट्रो सुरु करण्यात आली. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ही मेट्रो सुरु राहणार आहे. ‘सकाळी ७.१५ वाजता मेट्रो चारबागहून ट्रान्सपोर्ट नगरला जात होती. यावेळी दुर्गापुरी आणि मावैया स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. मेट्रोमुळे झालेल्या बिघाडामुळे आपत्कालीन ब्रेक वापरुन ती थांबवण्यात आली,’ अशी माहिती लखनऊ मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रसिद्धीपत्रकातून दिली.

मेट्रोत तांत्रिक बिघाड झाल्याने १०१ प्रवाशांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आल्याची माहितीदेखील प्रशासनाने दिली. यानंतर मेट्रो ट्रेन दुर्गापुरी मेट्रो स्टेशनला आणि त्यानंतर ट्रान्सपोर्ट नगर स्टेशनला नेण्यात आली. ज्यावेळी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यावेळी प्रशासनाचे अनेक अधिकारीदेखील मेट्रोतून प्रवास करत होते. एका मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इतरही ट्रेन्स रखडल्या.

लखनऊ मेट्रोचे सर्वाधिक तिकीट ३० रुपये असणार आहे. २०१३ मध्ये अखिलेश यादव यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. लखनऊमध्ये एकूण २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरु करण्याचा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा मानस होता. लखनऊ विमानतळ ते मुंशीपुलिया दरम्यान मेट्रो मार्ग सुरु करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ही मेट्रो कृष्णानगर, आलमबाग, चारबाग, हजरतगंज, इंदिरानगर भागातून जाणार आहे.