पंजाबमधील लुधियाना शहरात सहायक पोलीस आयुक्त पदावर काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. १३ एप्रिल रोजी या पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना शहरातील SPS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यमुळे पंजाबमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १६ वर पोहचला आहे.

देशभरात करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर हा पोलीस अधिकारी दररोज ९ ते १० तास कार्यरत होता. पंजाबमध्ये संचारबंदी लागू झाल्यानंतर भाजी मार्केट परिसरात अधिकारी गस्तीवर असायचे. ८ एप्रिल रोजी अधिकाऱ्याला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं, ज्यावेळी त्यांची करोनाची चाचणी झाली. १३ तारखेला या चाचणीचा अहवाल आला ज्यात अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र या अधिकाऱ्याला नेमक्या कोणत्या ठिकाणी करोनाची लागण झाली हे समजू शकलेलं नसल्याचं सिव्हील सर्जन डॉक्टर राजेश बग्गा यांनी सांगितलं.

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर शुक्रवारपासून पोलीस अधिकाऱ्याची तब्येत ढासळू लागली. यानंतर शरीरातले अनेक महत्वाचे अवयव काम करायचं बंद झाल्यामुळे पोलिस अधिकाऱ्याचा कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला. याव्यतिरीक्त लुधिनाया पोलिसांत काम करत असलेल्या आणखी एका सहायक पोलीस निरीक्षकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आतापर्यंत लुधियानात ४ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे.