उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शनिवारी सायंकाळी दुहेरी हत्याकांडांनं हादरली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शासकीय निवासस्थानाजवळच असलेल्या रेल्वे कॉलनीत ही घटना घडल्यानं खळबळ उडाली होती. रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीसह मुलाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी काही तासातच छडा लावला. रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलीनेच आई व भावाची हत्या केल्याचं तपासातून समोर आलं.

लखनौतील गौतम पल्ली येथील रेल्वे कॉलनीत दोघांची हत्या करण्यात आली होती. रेल्वेमध्ये उच्च पदावर अधिकारी असलेल्या आर.डी. वाजपेयी यांची पत्नी आणि मुलांची घरातच गोळ्या घालून हत्या केल्यानं खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मायलेकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी यांनीही घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणाचा पोलिसांनी लागलीच तपासही सुरू केला होता.

त्यानंतर काही तासातच पोलिसांना हत्याकांडांचा तपास लावण्यात यश मिळालं. रेल्वेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या वाजपेयी यांच्या पत्नी व मुलाची हत्या त्यांच्या मुलीनेच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. ही मुलगी राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असून, अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आरोपी मुलगी नैराश्यात आहे. घटनेनंतर ती ट्रामा सेंटरमध्ये दाखल झाली होती. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने स्वतः हत्या केल्याचं कबूल केलं. तिच्या हातावर ब्लेडच्या खुणा आढळून आल्या असून, ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नैराश्यात असलेल्या आरोपींवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.