आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे, अशा शब्दांत समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी हैदराबाद येथील घटनेवर संसदेत संताप व्यक्त केला. हैदराबाद येथे बलात्कार करून करून महिला पशुवैद्यकास पेटवून ठार करण्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले.

“निर्भया असो, कठुआ असो किंवा मग हैदराबादमध्ये घटलेली घटना असो, आता लोकांना सरकारकडून योग्य आणि निश्चित उत्तर हवंय. हैदराबादमध्ये ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच्या एक दिवस आधी तिथेच एक दुर्घटना घडली. तिथल्या सुरक्षाकर्मींना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा केला, त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी संसदेत दिली.

हैदराबादमधील घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने एक समिती नेमली आहे. तर केंद्र सरकारने महिलाविरोधी गुन्ह्य़ांबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून हैदराबादमध्ये महिलेला जिवंत जाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली.

काय आहे घटना?

हैदराबाद येथे गुरुवारी एका नाल्याजवळ सत्तावीस वर्षांच्या महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. तत्पूर्वी ती बेपत्ता झाल्याची तक्रार होती. तिच्या लहान बहिणीने याबाबत पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले होते, की तिच्या बहिणीचा बुधवारी रात्री ९.२२ वाजता फोन आला होता. ती टोल नाक्यावर अडकून पडली असून कुणीतरी तिला तिच्या स्कूटरचे टायर पंक्चर असल्याचे सांगून मदतीचा प्रयत्न केला. नंतर या सगळ्या प्रकारात मदतीच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करून तिला जाळून टाकल्याचे निदर्शनास आले.