आपल्या मुलाच्या मृत्यूचं वृत्त समजल्यानंतर आईनेही जीव सोडल्याची एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसात असणाऱ्या मुलाचं पश्चिम बंगालमध्ये कर्तव्य बजावत असताना जमावाने केलेल्या हल्यात निधन झालं होतं. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वयस्कर असणाऱ्या त्यांच्या आईचंही धक्का बसल्याने निधन झालं. दोघांवरही त्यांच्या गावात एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशनगंज पोलीस ठाण्याचे एसएचओ अश्विनी कुमार यांच्यावर १० एप्रिल रोजी जमावाने हल्ला केला. पश्चिम बंगालमधील उत्तर दिंजापूरमध्ये झालेल्या हल्ल्यात त्यांचं निधन झालं. अश्विनी कुमार यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आईलाही मोठा मानसिक धक्का बसला आणि निधन झालं.

पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांनी दिलेल्या आदेशानंतर दुचाकी चोरीप्ररकरणी अश्विनी कुमार यांच्यासोबत गावात गेलेले सात पोलीस कर्मचारी ज्यांनी हल्ल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक कुमार आशिष यांनी याप्रकरणी आदेश दिले आहेत.

नेमकं काय झालं –
अश्विनी कुमार यांनी आरोपीला पकडण्यासाठी बंगालमधील गावात धाड टाकली होती. दुचाकी चोरीप्रकरणी अश्विनी कुमार यांनी मध्यरात्री टीमसोबत धाड टाकली असता गावकऱ्यांनी त्यांच्या काठ्या आणि दगडांनी हल्ला केला. स्थानिक पोलिसांनी सुटका करुन त्यांनी रुग्णालयात नेलं असता मृत घोषित करण्यात आलं.

अश्विनी कुमार यांना बंगालमधील स्थानिक पोलिसांकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचा आरोप आहे. बिहार पोलिसांनी याप्रकरणी निवेदन प्रसिद्ध करत दिलेल्या माहितीनुसार, अश्चिनी कुमार यांनी स्थानिक पोलिसांकडे मदत मागितली होती. त्यांनी मदतीचं आश्वासनही दिलं होतं. पण कोणतीही मदत देण्यात आली नाही.