परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांची टीका

मानवी हक्कांचा मुखवटा धारण करून दहशतवाद पसरवणारे देश दांभिक असल्याची टीका परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी केली आहे. देशाच्या सत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमासाठी येथे आले असता त्यांनी सांगितले की, भारत हा असा देश आहे जेथे श्रद्धांची समानता मानली जाते. श्रद्धांच्या सर्वोच्चतेला मात्र यात स्थान नाही. दहशतवाद हा मानवी हक्कांना मोठा धोका आहे. मानवाधिकारांच्या नावाखाली जे देश दहशतवाद पसरवतात ते दांभिक आहेत. श्रद्धेची सर्वोच्चता ही संकल्पना योग्य नाही असे आमचे मत आहे. भारतीय दूतावासात तिरंगा फडकावल्यानंतर त्यांनी सांगितले की, श्रद्धा व धर्माला जास्त महत्त्व दिल्याने १९७१ मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली आता बलुचिस्थानही खदखदत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात व पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्याचार होत असल्याचा आरोप केला होता त्यावर पाकिस्तानने परखड प्रतिक्रियाही दिली होती. अकबर यांनी सांगितले की, मानवी हक्कांचा किंवा अधिकारांचा खरा शत्रू दहशतवाद आहे हे जगाला सांगायची ही वेळ आहे. श्रद्धेची समानता हे आमच्या देशाच्या प्राचीन तत्त्वज्ञानात सांगितले आहे. संस्कृतीला व स्थिरतेला आव्हान हे शेजारी देशाकडून दिले जात आहे. तेथे श्रद्धा व धार्मिक सर्वोच्चतेला प्राधान्य आहे. एक श्रद्धा किंवा धर्म इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे त्या देशात मानले जाते. भारताचा स्वातंत्र्य व समतेवर विश्वास आहे. ती तत्त्वे आम्ही श्रद्धेलाही लागू केली आहेत. स्वातंत्र्य म्हणजे मताचा अधिकार नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. भारतात अझान १४०० वर्षे ऐकू येते आहे व आणखी १४०० वर्षे ऐकू येईल. मी एक भारतीय मुस्लीम असल्याचा मला अभिमान वाटतो. महात्मा गांधी तसेच स्वातंत्र्यलढय़ात त्याग केलेल्यांच्या प्रेरणेतून राज्यघटना लिहिली गेली.

ती आधुनिकतेची व सगळ्या जगाच्या भविष्याची चौकट आहे. आमच्या राज्यघटनेतच स्वातंत्र्य आहे ते कुणी हिरावून घेऊ शकत नाही. पुढील सत्तर वर्षांत देशाची सर्वसमावेशक म्हणजे सर्व घटकांना बरोबर घेऊन भरभराट करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, तोच खरा राष्ट्रवाद आहे.