एम. करुणानिधी हे प्रखर बुद्धीमता आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेले नेते होते. आज राजकारणात त्यांची गरज होती. त्यांचे अवेळी निधन झाले असे मत माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केले. अण्णादुराई यांच्याकडून करुणानिधी यांना राजकारणाचे धडे मिळाले. करुणानिधी आणि एमजीआर म्हणजे एमजी रामचंद्रन हे अण्णादुराई यांचे डावे-उजवे हात होते. अण्णादुराई यांच्या नंतर द्रमुकचा विस्तार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. देशाला आणि तामिळनाडूला करुणानिधी यांची उणीव प्रकर्षाने जाणवेल असे भारतकुमार राऊत म्हणाले.

चित्रपटाच्या माध्यमातून ते राजकारणात आले. ते उत्तम लेखक होते. त्यांनी तामिळ राजकारणात स्वत:हाचे स्थान निर्माण केले असे राऊत म्हणाले. मागच्यावर्षी जयललिता यांचे निधन झाले आता करुणानिधी यांच्या निधनामुळे तामिळ राजकारणातील अख्खी फळी संपली आहे. आता करुणानिधी यांच्यानंतर त्यांच्या मुलांच्या हातात पक्षाची धुरा जाईल पण पक्षामध्ये भाऊबंदकी सुरु आहे. जयललिता यांच्या अण्णाद्रमुकमध्येही अशीच स्थिती आहे. पनीरसेल्वम आणि पलानीसामी यांच्या क्षमता पुढच्या निवडणूकांमध्ये दिसतील असे भारतकुमार राऊत म्हणाले.

पटकथा लेखक ते राजकारणी
पटकथा लेखक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. तामिळ भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळे ते चित्रपटांसाठी पटकथा लिहीत असत. त्यानंतर राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पाहता पाहता तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. पेरियार व अण्णा दुराई यांच्याकडून करुणानिधी यांना राजकारणातील धडे मिळाले. गेले काही वर्षे ते सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यातच त्यांच्या राजकीय विरोधक अण्णा द्रमुक प्रमुख जयललिता यांचे २०१७ मध्ये निधन झाले.

तामिळ संस्कृती आणि द्रविडी अभिमान यावर द्रमुकची पायाभरणी झाली. पण हिंदीविरोधी आंदोलनाने पक्षाला राष्ट्रीय राजकारणात ओळख दिली. केवळ सामाजिक कार्यामध्ये समाधान मानणाऱ्या पक्षाला १९५६च्या सुमारास लोकाग्रहास्तव निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरावे लागले. १९६७ मध्ये पक्ष बहुमताने सत्तेवर निवडून आला आणि दोन वर्षातच करुणानिधी मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या सरकारने कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्य भोजनाची योजना भक्कम करणे असे काही महत्त्वाचे निर्णय घेऊन तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.