कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी, ही द्रमुकने केलेली मागणी जयललिता यांनी फेटाळल्यानंतर आता द्रमुकचे नेते करुणानिधी यांनी थेट पंतप्रधानांनाच मंडळ स्थापन करण्याची विनंती केली आहे. अशा प्रकारचे मंडळ स्थापन करण्यासाठी कोणतीही कायदेशीर अडचण नाही, असे करुणानिधी यांनी म्हटले आहे.
कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करणे बंधनकारक आहे, असे जयललिता यांनी स्पष्ट केल्यानंतर करुणानिधी यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आणि कावेरी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत.
सदर प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी त्यामुळे कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नाही, कारण कावेरी जलतंटा लवादाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिलेली नाही, असेही करुणानिधी यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.