देशात सध्या करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळं कठीण परिस्थिती बनली आहे. मात्र, जे लोक परदेशातून आले आहेत किंवा जे लोक अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यांच्याशी लोक चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. त्यांच्याकडे संशयाच्या नजरेनं पाहत आहेत. ही बाब चुकीची असून सध्याच्या घडीला आपल्यासाठी सोशल डिस्टंसिंग गरजेचं असलं तरी इमोशनल डिस्टंसिंगही कमी करायला हवं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात द्वारे केली आहे.

मोदी म्हणाले, “मला काही अशा घटनांबाबत कळलं की, जे करोना विषाणूचे संशयीत रुग्ण आहेत तसेच ज्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलं आहे. अशा लोकांना इतर लोक वाईट वागणूक देत आहेत. ही गोष्टी ऐकूण मला अत्यंत वाईट वाटलं. हे खूपच वाईट आहे. आपल्याला हे समजावून घ्यावं लागेल की सध्याच्या काळात आपल्याला सोशल डिस्टंस राखायचंय. ना की इमोशनल किंवा मानवी डिस्टंस.”

“असे लोक कोणी अपराधी नाहीत तर ते विषाणूने पीडित आहेत. अशा लोकांनी दुसऱ्यांना लागण होऊ नये म्हणून स्वतःला वेगळं करुन घेतलं आहे. अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या जबाबदाऱ्यांना गांभीर्यानं घेतलं आहे. काहींनी तर या आजाराची कोणतीही लक्षणं दिसत नसतानाही स्वतःला क्वारंटाइन करुन घेतलं आहे. असं त्यांनी यासाठी केलं कारण ते परदेशातून परत मायदेशात आले आहेत आणि दुप्पट काळजी घेत आहेत. ते हे सांगू इच्छित आहेत की, कोणत्याही परिस्थितीत कोणी दुसरा व्यक्ती आपल्यामुळं बाधित होता कामा नये.”

“त्यामुळे जर लोक स्वतःहून अशी जबाबदारी दाखवत आहेत तर त्यांना वाईट वागणूक देणं हे कोणत्याही प्रकारे योग्य नाही. उलट त्यांच्यासोबत सहानुभुतीपूर्वक वागायला हवं. करोना विषाणूशी लढण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सोशल डिस्टंसिंग आहे. मात्र, आपल्याला हे लक्षात घ्याव लागेल की सोशल डिस्टंसिंगचा अर्थ सामाजिक संवाद संपवणं नाही. खरंतर हा काळ आपल्या सर्व जुन्या सामाजिक नात्यांमध्ये जीव फुंकण्याचा आहे. ही नाती अधिक घट्ट करण्याचा आहे. त्यामुळे हा काळ आपल्याला संदेश देतोय की सोशल डिस्टंसिंग वाढवा आणि इमोशल डिस्टंसिंग घटवा”, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी मन की बात द्वारे केलं.