News Flash

“मॅडम, मी मागील ४६ वर्षांपासून तुमच्या मागे धावतोय”; सुषमा स्वराज यांच्या पतीचे भावनिक पत्र

वयाच्या ६६ व्या वर्षी दिल्लीमध्ये झाले सुषमा स्वराज यांचे निधन

सुषमा स्वराज यांच्या पतीचे भावनिक पत्र व्हायरल

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. सुषमा यांच्या निधनानंतर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोशल नेटवर्किंगवरही राजकारण, मनोरंजन, क्रिडा आणि समाजकारण क्षेत्रातील दिग्गजांपासून सामान्यांनीसुद्धा सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र याच दरम्यान सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी पत्नीसाठी लिहिलेले एक पत्र व्हायरल झाले आहे.

सुषमा स्वराज यांनी तब्बेतीच्या कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देत सक्रीय राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पती स्वराज कौशल यांनी त्यांच्यासाठी एक खास पत्र लिहिले होते. तब्बेतीच्या कारणामुळे या पुढे कोणताही निवडणुक न लढण्याच्या सुषमा यांच्या निर्णयाचे स्वागत करत स्वराज कौशल यांनी या निर्णयासाठी पत्नीचे आभार मानले आहे. “मिल्खा सिंग यांनाही यापुढे धावाचे नाही असा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची मला आज आठवण झाली. तुझी राजकीय मॅरेथॉन १९७७ पासून सुरु झाली. या मॅरेथॉनदरम्यान तू ११ निवडणुका लढलीस. खरं तर तेव्हापासूनच्या सर्व निवडणुका तू लढली. अपवाद होता तो फक्त १९९१ आणि २००४ निवडणुकांचा जेव्हा पक्षाने तुला निवडणुक लढू दिली नव्हती. लोकसभेत चार वेळा, राज्यसभेत तीन वेळा आणि विधानसभेमध्ये तीनवेळा निवडूण आलीस. तू वयाच्या २५ व्या वर्षापासून निवडणुका लढत आहेस. मागील ४१ वर्षांपासून तू निवडणुक लढत आहेस ही खरोखरच एक प्रकारची मॅरेथॉनच झाली,” अशा शब्दांमध्ये राजकारणातून निवृत्त होणाऱ्या पत्नीला स्वराज कौशल यांनी या पत्रामधून त्याच्या राजकीय प्रवासाची सफर घडवली होती.

याच मॅरेथॉन कारकिर्दीचा संदर्भ देत स्वराज कौशल पत्राच्या शेवटी त्यांनी दोन मजेशीर मुद्दे मांडले. या पत्राच्या शेवटी स्वराज कौशल म्हणतात, ‘मॅडम, मागील ४६ वर्षांपासून मी तुमच्या मागे धावत आहे. मी आता १९ वर्षांचा राहिलो नाही. मला आता दम लागत आहे. धन्यवाद!’

कॉलेजच्या दिवसांपासूनच होते प्रेम

स्वराज आणि सुषमा कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. पंजाब विद्यापिठाच्या अंतर्गत येणाऱ्या चंढीगडमधील लॉ कॉलेजमध्ये पहिल्यांदा या दोघांची भेट झाली. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर घरच्यांची परवाणगी मिळाल्यानंतर १३ जुलै १९७५ रोजी लग्न केले. सुषमा यांचे पती स्वराज हे सर्वोच्च न्यायलयात प्रतिष्ठित वकील आहेत. स्वराज यांना वयाच्या ३४ व्या वर्षी अॅडव्हकेट जनरल पदावर नियुक्त करण्यात आले होते. ते सर्वात कमी वयाचे अॅडव्हकेट जनरल ठरले. तर वयाच्या ३७ व्या वर्षी ते मिझोरमचे राज्यपाल झाले. त्यांनी १९९० ते १९९३ या तीन वर्षांसाठी राज्यपाल पद भूषवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 12:47 pm

Web Title: madam i am running behind you for last 46 years husband swaraj kaushal heartfelt letter to sushma swaraj scsg 91
Next Stories
1 सुषमा स्वराज मदतीसाठी तत्पर असत, सरबजीत सिंह यांच्या बहिणीने सांगितली आठवण
2 भारतावर हल्ला करायचा का? इम्रान खान यांची संसदेत विचारणा
3 सुषमा स्वराज यांनी दिलदारपणे मान्य केली होती चूक
Just Now!
X