रिव्हॉल्वरशी शोले स्टाइल खेळ खेळणे एका तरुणीच्या जिवावर बेतले. मैत्रिणीसोबत व्हिडिओ चॅट करताना ही घटना घडली असून तरुणीचे वडील हे निवृत्त लष्करी जवान आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्वाल्हेरमधील राहणाऱ्या २१ वर्षीय करिश्मा या तरुणीने ७ सप्टेंबर रोजी तिची मैत्रिण नझमाला फोन केला. दोघींमध्ये व्हिडिओ चॅटिंग सुरु होते. यादरम्यान करिश्माने वडिलांच्या कपाटातून रिव्हॉल्वर बाहेर काढली. यात एकच गोळी असून बघूया माझ्या नशिबी मृत्यू लिहीलंय का?, असे तिने सांगितले. यावर नझमाने तिला बंदुकीशी खेळू नको, असे सांगितले. करिश्मा मस्करीमध्ये बोलत असावी, असे तिला वाटत होते.

यानंतरही करिश्माने रिव्हॉल्वर कानाजवळ धरली आणि ट्रिगर दाबला. नेमका याच वेळी नझमाचा फोन कट झाला. ती मेट्रो ट्रेनमधून प्रवास करत असल्याने फोन कट झाला. यानंतर नझमाने पुन्हा करिश्माला फोन केला असता तिने ‘मला गोळी लागली’, असे सांगत फोन कट केला.

दुसरीकडे करिश्माचा भाऊ शिवम हा घरी परतला असता त्याने बहिणीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्याने तातडीने बहिणीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता करिश्माने नझमाला शेवटचा फोन केल्याचे उघड झाले. पोलिसांनी नझमाची चौकशी केली. यात नझमाने करिश्मासोबत व्हिडिओ चॅटदरम्यान काय संवाद झाला, याची माहिती दिली.
करिश्माचे वडील अरविंदसिंह यादव हे चार महिन्यांपूर्वीच लष्करातून सुभेदारपदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे रिव्हॉल्वरचा परवानाही होता. त्यांचा मुलगा शिवम हा देखील नुकताच सैन्यात भरती झाला आहे. करिश्मा ही एनसीसीतील टॉपर असून एनसीसीत असतानाच तिने शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही मिळाले होते, अशी माहिती कुटुंबीयांनी नातेवाईकांना दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh 21 year old girl shoots herself with revolver on video chat with friend in gwalior
First published on: 11-09-2018 at 14:26 IST