मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला. या पीडित मुलीची आता मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडित मुलीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याने ३ सेंटीमीटरची जखम झाली आहे. त्यामुळे पीडित मुलगी बोलू शकत नाही. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच तिच्या शरीरावरही अनेक जखमा आहेत. तिच्या प्रायव्हेट पार्टच्या जखमाही खोलवर आहेत अशी माहिती समोर आली आहे. या मुलीवर इंदौरमध्ये उपचार सुरु आहेत. या मुलीची स्थिती काही प्रमाणात सुधारते आहे. मात्र अद्यापही मानसिक धक्क्यातून ती सावरलेली नाही. अनेक जखमांतून रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने अजूनही तिच्या मृत्यूचा धोका टळलेला नाही.

दरम्यान या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मंदसौरच्या जनतेचा आक्रोश आंदोलनातून समोर आला आहे. एका २० वर्षांच्या नराधमाला पोलिसांनी शुक्रवारीच अटक केली होती. त्यानंतर आता आणखी एका नराधमाला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी मंदसौर बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी आंदोलनाची ठिणगी निमचमध्येही पडली आहे. शुक्रवारी गरोथ, पिपलियामंडी, नारायणपुरा, जरोरा, इंदौर, देवास आणि अगर-मालवा येथील लोकांनीही नराधामांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

इरफान अलियास भय्यू असे एका नराधमाचे तर आसिफ असे दुसऱ्या नराधमाचे नाव आहे अशी माहिती मंदसौरचे पोलीस अधीक्षक मनोज सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली. इरफानची रवानगी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. तर आसिफच्या कोठडीसाठी पोलिसांनी कोर्टात धाव घेतली आहे. दोघांवरही पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे दोघेही मदारपुरा भागातील रहिवासी आहेत. या दोघांना कठोरातले कठोर शासन व्हावे यासाठी मुस्लिम बांधवांनीही मोर्चा काढला होता अशी माहितीही समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

मंदसौरमध्ये राहणारी आठ वर्षांची मुलगी मंगळवारी शाळेत गेली होती. ती दुसरी इयत्तेत शिकते. मंगळवारी संध्याकाळी तिचे आजोबा तिला घेण्यासाठी शाळेत गेले असता १५ मिनिटांपूर्वीच ती शाळेतून निघून गेल्याचे समजले. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच दिसत नव्हती. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनीही मुलीचा शोध सुरु केला.

बुधवारी सकाळी १० वाजता लक्ष्मण गेटजवळील झाडाझुडपात पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तिच्या बाजूला बिअरच्या बाटलीचे तुकडे होते. तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदौरमधील रुग्णालयात हलवण्यात आले. आता या मुलीची मृत्यूशी झुंज सुरु आहे असेच समजते आहे.