मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये ‘निर्भयाकांड’ सारखीच घटना असून एका नराधमाने आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २० वर्षांच्या नराधमाला अटक केली असून या घटनेच्या निषेधार्थ मंदसौरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

मंदसौरमध्ये राहणारी आठ वर्षांची मुलगी मंगळवारी शाळेत गेली होती. ती दुसरी इयत्तेत शिकते. मंगळवारी संध्याकाळी तिचे आजोबा तिला घेण्यासाठी शाळेत गेले असता १५ मिनिटांपूर्वीच ती शाळेतून निघून गेल्याचे समजले. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच दिसत नव्हती. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनीही मुलीचा शोध सुरु केला.

बुधवारी सकाळी दहा वाजता लक्ष्मण गेटजवळील झाडाझुडपात पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तिच्या बाजूला बीयरच्या बॉटलचे तुकडे होते. तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदौरमधील रुग्णालयात हलवण्यात आले.

‘पीडित मुलीच्या गळ्यावर चाकूने वार केल्याने तीन सेमी. खोल जखम झाली आहे. त्यामुळे पीडित मुलगी बोलू शकत नाही. तिच्या शरीरावर सर्वत्र जखमा असून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे’, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. पीडित मुलीच्या कुटुंबियांनाही या घटनेने मानसिक धक्का बसला आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी इरफान उर्फ भय्यू याला अटक केली आहे. इरफानने नातेवाईक आजारी असल्याचे सांगत पीडित मुलीला स्वत:सोबत नेले. त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली असून या घटनेने मंदसौरमध्ये सर्वत्र संतप्त व्यक्त होत आहे. गुरुवारी मंदसौरमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली होती. तर शुक्रवारी शहरात बंदची हाक देण्यात आली आहे. पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला असून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा न्यायालयातील वकिलांनी नराधमाचे वकीलपत्र घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल, असे सांगितले.