मध्यप्रदेशमधील एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत तुरुंगात वेळ घालवायचा आहे. या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याने वरिष्ठांना पत्र पाठवून तशी विनंतीही केली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राची सध्या मध्यप्रदेशमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. बिल्डर प्रदीप जैन हत्येप्रकरणी सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांच्याविरोधात एकूण ५४ गुन्हे दाखल आहेत. अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेम सोबत मध्यप्रदेशमधील गुना येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी नियाज खान यांना एक महिना तुरुंगात वेळ घालवायचा आहे. खान हे अबू सालेमच्या जीवनावर पुस्तक लिहीणार असून सालेमचा अंडरवर्ल्डमधील प्रवास आणि अन्य माहिती जाणून घेण्यासाठी मला त्याच्या सोबत तुरुंगात महिनाभर वेळ घालवायचा आहे  असे खान यांचे म्हणणे आहे. अबू सालेम आणि मोनिका बेदीचे प्रेमसंबंध यावर पुस्तकात भर दिला जाईल असे त्यांनी सांगितले. खान यांचे आत्तापर्यंत चार पुस्तक प्रकाशित झाले असून अबू सालेमवरील पुस्तक हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे.

नियाज खान यांनी भोपाळमधील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अबू सालेमसोबत एक महिना वेळ घालवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. खान यांच्या पत्राने अधिकारीही चक्रावले आहेत. खान यांचा अर्ज अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्र सरकारला विनंती करावी असेही खान यांनी म्हटले आहे. अबू सलेमची भेट आणि सविस्तर अभ्यासामुळे राज्य सरकारला तुरुंगात सुधारणा करताना फायदाच होईल असा दावाही त्यांनी केला आहे. आता खान यांच्या पत्रावर सरकार काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.