मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातील धामनोद नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचार करणाऱ्या भाजप उमेदवाराला रविवारी एका वृद्ध मतदाराच्या रोषाचा सामना करावा लागला. भाजपचे उमेदवार दिनेश शर्मा यांच्या गळ्यात एका वृद्धाने चपलेचा हार घातला. मतदाराने फुलांएवजी चपलेचा हार गळ्यात घातल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची मात्र कोंडी झाली.

धामनोदमध्ये सध्या नगर पंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून उमेदवारांचा प्रचारही जोमात सुरु आहे. भाजपचे उमेदवार दिनेश शर्मा हे प्रचारासाठी प्रभाग क्रमांक १ येथे गेले होते. प्रचारफेरीत दिनेश शर्मा मतदारांशी संवाद साधत होते. या दरम्यान गुलझरामधील वृद्ध नागरिकाने शर्मा यांच्या गळ्यात चपलेचा हार घातला. यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने चपलेचा हार काढला खरा मात्र तोवर घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वृद्धाची ओळख पटली असून त्यांचे नाव परसराम असे आहे.

गावात पाणीटंचाईची समस्या असून यासाठी गावातील महिला माजी नगराध्यक्षांच्या घरी गेल्या होत्या. मात्र, मदत करण्याऐवजी महिलांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर गावातील महिलांना रात्री-अपरात्री पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागली होती. यामुळे परसराम संतापले होते आणि यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

दिनेश शर्मा यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली. ‘सर्व ग्रामस्थ माझेच आहेत. ते कोणत्या तरी कारणामुळे माझ्यावर नाराज असतील. मी त्यांच्याशी चर्चा करुन समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. परसराम हे माझ्या वडिलांसारखेच आहेत, असे त्यांनी सांगितले.