लग्न हा एक पवित्र सोहळा मानला जातो. या सोहळ्यामुळे फक्त पती पत्नीच नाही तर दोन कुटुंबं एकत्र येतात असेही म्हटले जाते. लग्नात पाळल्या जाणाऱ्या रुढी आणि परंपरा पाळल्या नाहीत तर काय होऊ शकतं याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. नवऱ्या मुलीने डोक्यावरून पदर घेण्यास नकार दिल्यानं लग्न मोडल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील एका जोडप्याचा विवाह रतलाममध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र हे लग्न एका क्षुल्लक कारणामुळे मोडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वर्षा सोनावा आणि वल्लभ पांचोली या दोघांचा विवाह सोहळा रतलाममध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याची सुरुवात जशी उत्साहात व्हायला हवी तशीच झाली. वर्षाने गाऊन घातल्याचे जेव्हा तिच्या सासरच्या मंडळींना लक्षात आले तेव्हा त्यांनी वर्षाला साडी नेसण्यास आणि डोक्यावरून पदर घेण्यास सांगितले. वर्षाला मात्र हा प्रकार आवडला नाही. त्यानंतर मुलाकडचे लोक आणि मुलीकडचे लोक यांच्यात वाद सुरु झाला. नवऱ्या मुलाने सगळी वरात थेट पोलीस ठाण्यात नेली. तिथे त्याने नवऱ्या मुलीविरोधात आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात थेट तक्रारच दाखल केली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांमधले भांडण काही थांबता थांबले नाही अखेर या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आणि हे लग्न मोडले.

वल्लभ आणि वर्षा हे दोघेही उच्च शिक्षित आहेत. वल्लभ हा सिव्हील इंजिनिअर आहे तर वर्षा सरकारी कर्मचारी. मात्र साडी नेसण्यावरून आणि डोक्यावर पदर घेण्यावरून झालेला वाद इतका विकोपाला पोहचला की या दोघांचे लग्नच मोडले. प्रथेला फाटा देण्याच्या, रुढी, परंपरा न पाळण्याच्या गोष्टी समाजात होतात. मात्र त्याचवेळी अशा प्रथांना महत्त्व दिलं की गोष्टी कोणत्या थराला जाऊ शकतात याचं हे उदाहरण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.