बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना मध्य प्रदेशातही २८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले. पक्षांतरामुळे आमदारकी गेल्यानं मध्य प्रदेशात पुन्हा निवडणूक घेण्यात आली.

१९ जिल्ह्यातील विधानसभेच्या २८ जागांसाठी मध्य प्रदेशात मतमोजणी सुरु आहे. मध्य प्रदेशातील निकाल शिवराज सिंह चौहान सरकारचे भवितव्य निश्चित करणार आहेत तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांचा राज्याच्या राजकारणातील प्रभावही निश्चित होणार आहे.

मतमोजणीचा आतापर्यंतचा जो कल आहे, त्यानुसार २८ पैकी १८ जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस आठ तर बसपाचे उमेदवार दोन विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात सरकार राखण्यासाठी भाजपाला फक्त आठ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. सध्याच्या संख्याबळानुसार, २३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत भाजपाचे १०७ आमदार आहेत तर काँग्रेसचे संख्याबळ ८७ आहे.