बिहारबरोबरच मध्य प्रदेशातही निवडणुकीची चर्चा आहे. मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली असून, आज निकाल जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. निवडणुकीच्या प्रचारात त्याची झलकही दिसून आली. त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार, त्यावरून सत्तेचं चित्र स्पष्ट होणार आहे.

कमलनाथ यांचं सरकार असताना भाजपाने काँग्रेसचे आमदार फोडले होते. त्यामुळे अल्पमतात आलेलं कमलनाथ यांचं सरकार कोसळलं. याच काळात ज्योतिरादित्य शिंदे यांनी समर्थक आमदारांसह भाजपात प्रवेश केला. पक्षांतरामुळे आमदारकी गेल्यानं मध्य प्रदेशात पुन्हा निवडणूक घेण्यात आली.

२८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवराज सिंह चौहान यांचं सरकार टिकणार की, काँग्रेसचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. इंडिया टुडे अॅक्सिसच्या मतदानोत्तर चाचण्यामध्ये भाजपाला १६ ते १८ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला १० ते १२ जागा मिळू शकतात.

भाजपाला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ८ जागा जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळेच प्रचारात भाजपा काँग्रेस एकमेकांवर तुटून पडताना दिसले. विशेष म्हणजे वादग्रस्त विधान आणि घसरलेल्या प्रचाराच्या पातळीमुळेही ही पोटनिवडणूक चर्चेत राहिली. ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत प्रचाराची पातळी प्रचंड घसरल्याचं पाहायला मिळालं. मध्य प्रदेश विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २३० आहे. आमदार राहुल सिंह यांनी राजीनामा दिल्यानं सध्या २२९ आमदार आहे. त्यामुळे बहुमतासाठी ११५ जागांचं बहुमत असणं आवश्यक आहे. भाजपाकडे सध्या १०७ आमदार आहेत. तर काँग्रेसकडे ८७ आमदार आहेत.