पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी होणार असून प्रशासनाने याची तयारीही केली आहे. निवडणूक आयोगानेही त्यांच्याकडून बंदोबस्त लावला आहे. परंतु, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून ईव्हीएमबाबत काही घटनांमुळे त्याची सुरक्षितता आणि गोपनीयतेवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी स्ट्राँग रुमच्या बाहेर पहारा दिला आहे.

मध्य प्रदेशमधील विदिशा येथेही काँग्रेस कार्यकर्ते स्ट्राँगरुम बाहेर पहारा देत आहेत. काँग्रेसने येथे ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी काही खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. हे सुरक्षारक्षक २४ तास स्ट्राँग रुमच्या बाहेर उभे आहेत.

विदिशाचे काँग्रेसचे उमेदवार शशांक भार्गव म्हणाले की, मोदी सरकार आणि शिवराज सरकारवर आमचा विश्वास नाही. यंत्रणेवर आमचा भरवसा आहे. पण जर अधिकाऱ्यांवर दबाव आला तर ते काहीतरी चुकीचे करु शकतात. त्यामुळे आम्ही आमचे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुमच्या सुरक्षेची परवानगी उमेदवारांना द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेंबरला मतदान झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनंतर ३० नोव्हेंबर रोजी भोपाळ येथील स्ट्राँग रुममध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुमारे एक तास बंद होते. प्रशासनाने वीज गेल्याचे कारण सांगितले. परंतु, या घटनेनंतर ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने वाद सुरु झाला.

राजस्थानमध्येही अशाच स्वरुपाच्या काही घटना समोर आल्या. तिथेही इव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. येथील पाली जिल्ह्यात भाजपा उमेदवाराने घरी ईव्हीएम घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किशनगंज विधानसभा मतदारसंघात बॅलेट यूनिट रस्त्याच्या बाजूला आढळून आले होते. दोन्ही प्रकारात निवडणूक आयोगाने ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.