मध्य प्रदेशमधील टीकमगड जिल्ह्यामध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील अरुण मिश्रा नावाचा २४ वर्षीय तरुण गावात झालेल्या एका लग्नामध्ये सहभागी झाला. तो वरातीमध्ये नाचाला, पंगतीला त्याने जेवायला वाढलं आणि सर्वांसोबत अगदी आनंदात त्याने लग्न केलं. मात्र हे सारं करताना त्याने जवळजवळ साऱ्या गावाला करोनाबाधित केलं आहे. पोलिसांनी आता हे संपूर्ण गावच सील केलं आहे. तपासामध्ये या तरुणाला करोनाची लागण झाल्याचं त्याला ठाऊक होतं तरी तो लग्नात सहभागी झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

हा संपूर्ण प्रकार घडला पृथ्वीपूर ब्लॉकमधील लुहरवा गावामध्ये घडला. अरुणला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती गावकऱ्यांना काळाली आणि एकच खळबळ उडाली. प्रशासनाने आता गावातील लोकांच्या करोना चाचण्या करण्यास सुरुवात केलीय. गावामध्ये आतापर्यंत ४० हून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत.

२७ एप्रिल रोजी अरुण मिश्राच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्यानंतरही तो क्वारंटाइन झाला नाही. प्रशासनाकडूनही त्याच्या घरी कोणी चौकशीसाठी किंवा तो करोना पॉझिटिव्ह असल्याचं गावाला कळवण्यात आलं आहे. त्यानंतर २९ एप्रिल रोजी अरुण गावातील एका लग्न समारंभाला उपस्थित राहिला होता. तो लग्नातील जवळजवळ प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमामध्ये गर्दीत मिसळून फिरत होता. त्याने रिसेप्शनमध्ये नवदांपत्यासोबत फोटोही काढला.

या लग्नानंतर गावातील अनेक लोकं हळूहळू आजारी पडू लागले. त्यानंतर डॉक्टरांकडे करोना चाचणी करण्यासाठी गावातील लोकांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या. चाचण्यांमध्ये ४० गावकरी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. अरुण मिश्रा ज्या बडा बाजार परिसरात राहतो तेथेच सर्वधिक रुग्ण आढळून आल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

एकाच गावामध्ये करोनाचे ४० हून अधिक रुग्ण आढळून आल्याचं समजल्यानंतर प्रशासनाने गाव सील केलं आहे. गावाच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स टाकण्यात आले असून गावातून लोकांना बाहेर जाण्यावर आणि बाहेरच्या कोणीही गावात येण्यावर बंदी घालण्यात आलीय. या प्रकरणामध्ये संपूर्ण तपास करुन संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या गावामध्ये करोना टेस्टींग करण्यात येत आहे.