काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर इमरती देवी यांच्याविषयी केलेल्या असभ्य टीकेमुळे चौफेर टीका होताना दिसत आहे. विशेषतः सत्तेत असलेल्या भाजपानं याचं मुद्यावरून आता काँग्रेसला घेरलं असून, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांनी माफी मागावी, अशी मागणी करत टीकास्त्र डागलं आहे.

ग्वाल्हेरच्या डबरा मतदारसंघात भाजपाने इमरती देवी यांना उभे केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार हे साधे असून, इमरती देवी यांच्यासारखे ‘आयटम’ नाहीत, असे वक्तव्य रविवारी येथे एका निवडणूक प्रचारसभेतील भाषणात कमलनाथ यांनी केलं होतं.

आणखी वाचा- कमलनाथ यांच्यानंतर आता भाजपाच्या मंत्र्याची देखील जीभ घसरली!

या विधानावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं असून, त्यांच्याकडून काहीही उत्तर आलेलं नाही, असं ते म्हणाले. “अजूनही तुम्हाला (कमलनाथ) इमरती देवी यांचं नाव आठवलेलं नाही. २४ तासांत पूर्ण देशानं इमरती देवींना बघितलं. त्या तुमच्या मंत्रिमंडळात होत्या. सरळ सरळ माफी का मागत नाहीत? आणि आयटमचं स्पष्टीकरण देत आहेत. मी काल सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं. त्याचं उत्तर मला मिळालेलं नाही. हा अहंकार आहे. ते (कमलनाथ) स्वतःपेक्षा कुणालाही मोठं समजत नाहीत आणि याच कारणामुळे त्यांचं सरकार कोसळलं. कारण त्यांनी राज्यालाच उद्ध्वस्त केलं होतं,” अशी टीका चौहान यांनी केली आहे.

आणखी वाचा- कमलनाथ यांनी ‘त्या’ वक्तव्यावर मागितली माफी, म्हणाले…

इमरती देवी व इतर २१ जण हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असून ते राजीनामे देऊन भाजपमध्ये गेले होते. त्यांनी मार्चमध्ये काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केल्याने कमलनाथ सरकार कोसळले होते. मध्यप्रदेशच्या २८ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका ३ नोव्हेंबरला होत असून १० नोव्हेंबरला मतमोजणी आहे.