मध्यप्रदेशमधील बालाघाट येथे फटाक्याच्या कारखान्यात बुधवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाला असून स्फोटामुळे लागलेल्या आगीत २० कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. फटाक्यांचा स्फोट इतका भीषण होता की यात कारखान्याची भिंतही कोसळली आहे.

बालाघाट जिल्ह्यातील कटेरा गावात फटाक्याचा कारखाना असून या कारखान्यात दुपारी तीनच्या सुमारास स्फोट झाला आणि यानंतर कारखान्यात आग पसरत गेली. या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. प्राथमिक माहितीनुसार कारखान्यातील कामगाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली. एका कामगाराने वीडीचा जळता तुकडा फेकला होता. पण हा तुकडा फटाक्यांवर पडल्याने ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. अद्याप पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले.

स्फोटानंतर कारखान्याची भिंत कोसळली असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असावे अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या आगीत जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणेही मुश्कील झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटाचा आवाज येताच १२ पेक्षा जास्त कामगारांनी कारखान्याबाहेर पळ काढल्याने ते बचावले आहेत. आग नेमकी का लागली याची चौकशी करण्याचे आदेश संबंधीतांना दिल्याचे जिल्हाधिकारी भरत यादव यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत दिली जाईल असे जाहीर केले.

बालाघाटमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग लागल्याची घटना २०१५ मध्येही घडली होती. या आगीमुळे १२ घरांचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.