मध्य प्रदेशातील आंदोलनास हिंसक वळण; पोलिसांनी गोळ्या झाडल्या नसल्याचा सरकारचा दावा

महाराष्ट्राचे शेजारी राज्य असलेल्या व महाराष्ट्राप्रमाणेच भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाने मंगळवारी कमालीचे हिंसक वळण घेतले. आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबारात किमान पाच शेतकरी ठार झाले. मात्र, ‘पाच जणांचे प्राण घेणारा हा गोळीबार पोलीस किंवा केंद्रीय राखीव पोलीस दलाने केलेला नाही’, असा दावा मध्य प्रदेश सरकारने केल्याने त्याबाबत वादंग उभा राहिला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्य़ात गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कर्जमाफी, शेतमालाला रास्त भाव आदी मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी, मंगळवारी पिपलियामंडी येथील पिपलिया टोलनाक्यावर हिंसाचार उसळला. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तसेच रस्त्यावरून जाणारी काही वाहने त्यांनी पेटवून दिली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. त्यामुळे धुमश्चक्रीची धार अधिकच वाढली. त्याच दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार झाला व त्यात पाच शेतकऱ्यांनी जीव गमावला. कन्हैयालाल पाटीदार, बाबूलाल पाटीदार, चैनसिंह पाटीदार, अभिषेक पाटीदार व सत्यनारायण अशी त्यांची नावे आहेत.  या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले.

या घटेनंतर मांडसौरमधील इंटरनेट सेवा तातडीने बंद करण्यात आली. मात्र गोळीबारात शेतकरी ठार झाल्याचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने परिसरात पसरल्याने ठिकाठिकाणी शेतकरी आक्रमक होत रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड तसेच जाळपोळही करण्यात आली. त्यामुळे लगेचच हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली. शेजारच्या रतलाम जिल्ह्य़ातही प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर आरोप

शेतकऱ्यांकडून आठ रुपये किलो दराने कांदा व ठरलेल्या दराने मूगडाळ खरेदी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी दिले होते.

त्या आश्वासनाची आठवण चौहान यांनी मंगळवारी करून दिली व शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून हिंसाचार घडविण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. गोळीबारातील मृत्युमुखी शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.

काय घडले?

  • मंदसौर जिल्ह्य़ातील पिपलियामंडी येथील पिपलिया टोलनाक्यावर हिंसाचार.
  • शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक. पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा. याच धुमश्चक्रीदरम्यान गोळीबार.
  • हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी. जिल्ह्य़ातील मोबाइल, इंटरनेट सेवा बंद.

.. मग गोळीबार नेमका कुणाचा?

पाच शेतकऱ्यांचे प्राण घेणारा गोळीबार पोलिसांनी केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मात्र, ‘आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश पोलिस वा केंद्रीय राखीव पोलीस दल यांपैकी कुणालाही देण्यात आले नव्हते, त्यामुळे गोळीबार त्यांच्याकडून झालेला नाही’, असा पवित्रा राज्याचे गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी घेतला. मांडसौरचे जिल्हाधिकारी एस. के. सिंह यांनी देखील, ‘पोलिसांनी गोळीबार केलेला नाही’, अशी बाजू मांडली.