मध्य प्रदेशमधील महिलांनी मजुरी मिळाली नाही म्हणून राज्य सरकारविरोधात अभिनव आंदोलन केले. सोमवारी या महिलांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे छायाचित्र कापून ते फुटबॉलवर चिटकवले आणि फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. सरकार ज्याप्रमाणे सामान्य लोकांना फुटबॉल बनवून लाथा मारत आहे. त्याचपद्धतीने आम्ही त्यांना येणाऱ्या निवडणुकीत कीक मारणार आहोत, अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली आहे.

मंगळवारी या महिलांचे छायाचित्र विविध वृत्त वाहिन्या आणि सोशल मीडियावर आल्यानंतर महिलांचे हे आंदोलन समोर आले. खंडवा येथील महिलांनी हे अभिनव आंदोलन केले. रेशम उत्पादक शेतकऱ्यांनी सात दिवसांपासून धरणे धरले आहे. चार वर्षांपूर्वी मनरेगा अंतर्गत त्यांनी रेशम उत्पादनासाठी वृक्ष लावले होते. पण अजूनही त्यांना मजुरी देण्यात आलेली नाही.

महिला शेतकऱ्यांनी याचा विरोध करण्यासाठीच शिवराज सिंह चौहान यांचे छायाचित्र असलेल्या फुटबॉलवर आपला राग काढला. पोलिसांना जेव्हा याबाबत समजले तेव्हा त्यांनी आंदोलकांना असे करण्यापासून रोखले. यावर्षी मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.