मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार हेमंत कटारे यांच्याविरोधातील बलात्काराच्या प्रकरणात गुरुवारी नवा ट्विस्ट आला. भाजपा नेते अरविंद भदोरिया यांच्या सांगण्यावरुनच मी हेमंत कटारेंविरोधात बलात्काराची तक्रार केली, असे प्रतिज्ञापत्रच बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने न्यायालयात सादर केले आहे.

मध्य प्रदेशमधील भदोरिया मतदार संघातील पोटनिवडणुकीत गेल्या वर्षी अरविंद भदोरिया यांचा काँग्रेसचे उमेदवार हेमंत कटारे यांनी पराभव केला होता. काही महिन्यांपूर्वी हेमंत कटारे यांच्यावर पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. गुरुवारी त्या तरुणीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. यात ती म्हणते, ‘माझ्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. मी भोपाळ कारागृहात असताना सहआरोपी विक्रमजीत, एक वकील आणि त्याचे दोन मित्र मला २७ जानेवारी रोजी भेटण्यासाठी आले. विक्रमजीतने माझा खटला मोफत लढवला जाईल, असे आश्वासन दिले. पण या मोबदल्यात माझ्यासमोर अट ठेवण्यात आली. हेमंत कटारेविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले. मी सुरुवातीला नकार दिला. पण यानंतर कारागृहात माझ्यावर दबाव टाकण्यात आला. माझा छळ करण्यात आला. मी तक्रार दाखल केली नाही, तर आणखी तीन महिने तुरुंगातच राहावे लागेल असे मला सांगण्यात आले. शेवटी या छळाला कंटाळून मी खोटी तक्रार दाखल केली, असे तिने प्रतिज्ञापत्रात सांगितले. राजकारणासाठी माझा वापर झाला असून मी खरं बोलत आहे. मी नार्को टेस्टसाठीही तयार आहे, असे त्या तरुणीने न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले.

काँग्रेस आमदार हेमंत कटाले यांनी एका तरुणीविरोधात खंडणी आणि ब्लॅकमेल केल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्या तरुणीने कटाले यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. यानंतर पोलिसांनी कटालेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

भदोरिया यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मी चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. हे माझ्याविरोधातील षडयंत्र आहे’, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस आमदार हेमंत कटाले यांनी जानेवारीमध्ये एका तरुणीविरोधात खंडणी आणि ब्लॅकमेल केल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्या तरुणीने कटाले यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते.