मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यामध्ये एका विचित्र अपघातात १५ जण विहिरीत पडल्यानंतर रात्रभर सुरु असणाऱ्या मदतकार्यादरम्यान तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या १९ जणांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. यासंदर्भातील माहिती जिल्ह्याचे पालक मंत्री विश्वास सारंग यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे. सध्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्या आणि राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्यांकडून येथे मदतकार्य सुरु आहे. सारंग स्वत: या ठिकाणी रात्रीपासून उपस्थित असून मदतकार्यावर लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीच या प्रकरणामध्ये सर्व खबरदारी घेण्याची सूचना रात्रीच संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना केलीय.

“१९ जणांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या मदतकार्य करत आहेत. येथील माती सतत पडत असून अनेकदा असं घडलं आहे. त्यामुळे संपूर्ण मदतकार्य पूर्ण होईपर्यंत नक्की किती जणांचा यामध्ये प्राण गेलाय हे सांगणं कठीण आहे,” असं सारंग म्हणाले.

गुरुवारी सायंकाळी विदिशा जिल्ह्याच्या गंजबासौदा भागातील लाल पठार परिसरामध्ये हा विचित्र अपघात घडला. संध्याकाळच्या सुमारास एक व्यक्ती इथल्या एका विहिरीमध्ये पडल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. मात्र, त्यापाठोपाठ त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आणि ते ‘बचावकार्य’ बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं या विहिरीभोवती गर्दी झाली. प्रशासन तिथे पोहोचेपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्यादरम्यानच हा अपघात घडला.

विहिरीच्या भोवती बघ्यांची गर्दी एवढी वाढली की तिथेच चेंगराचेंगरी होण्याची परिस्थिती निर्माण झाली. विहिरीभोवती बांधण्यात आलेल्या कठड्यावरून वाकून वाकून सर्व लोक विहिरीत पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न बघत होते. मात्र, हा भार विहिरीच्या कठड्याला पेलवला नाही आणि अचानक कठडा खचला. कठडाच मोडून पडल्यानंतर त्याला रेलून उभे असलेले किमान १५ जण एकाच वेळी विहिरीत पडले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी मदतकार्य सुरु केलं.

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तातडीने डीजीपी, एसडीआरएप, आयजी यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. तसेच, आपण स्वत: बचावकार्यावर लक्ष ठेऊन आहोत, असं देखील चौहान यांनी स्पष्ट केलं आहे. रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करण्यात अनेक अडचणींचा सामना बचाव पथकाला करावा लागला.