शिकायची जिद्द असेल तर माणूस आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करतो असं म्हणतात. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका शाळकरी मुलीने अभ्यास आणि शिक्षणाप्रती आपली जिद्द संपूर्ण दाखवून दिलं आहे. घरातून शाळा आणि शाळेतून घर असा दररोज २४ किमी चा प्रवास करणाऱ्या रोशनी भदोरिया या मुलीने दहावीच्या परीक्षेत ९८.७५ टक्के गूण मिळवले आहेत. पुढे जाऊन शासकीय सेवेत काम करण्याची रोशनीची इच्छा आहे.

भिंड जिल्ह्यातील अजनोल गावात रोशनी आपल्या पालकांसोबत राहते. रोशनीचे वडील शेतकरी आहेत. आपल्या मुलीने मिळवलेल्या यशामुळे खुश झालेल्या रोशनीच्या वडिलांनी तिच्या पुढच्या शिक्षणासाठी चांगल्या प्रवासाची सोय करण्याचं ठरवलं आहे. मध्य प्रदेश बोर्डात रोशनीने आठवा क्रमांक मिळवला. आठवीपर्यंत रोशनी एका स्थानिक शाळेत शिकत होती. मात्र यानंतर अजनोल गावापासून १२ किलोमीटर दूर असलेल्या मेहगाव येथील सरकारी शाळेत रोशनी शिकायला लागली. या ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वाहनाची सोय होत नसल्यामुळे तिने नवव्या इयत्तेपासून सायकलने प्रवास करायला सुरुवात केली. रोशनीचे वडील पुरषोत्तम भदोरिया यांना दोन मुलं आहेत, पण आपल्या मुलीने मिळवलेल्या यशामुळे गावात सर्वजण भदोरिया परिवाराचं कौतुक करत आहेत.

सायकलवरुन प्रवास करणं खूप कठीण होतं. वर्षभरात मी किमान ६० ते ७० दिवस सायकलने प्रवास करायचे. ज्यावेळी बाबांना कोणतंही काम नसायचं त्यावेळी ते मला सोडायला यायचे. घरी आल्यानंतर रोशनी दररोज सात ते आठ तास अभ्यास करायची. यानंतर IAS अधिकारी बनणं हे रोशनीचं ध्येय आहे.