मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटींची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने दिले होते. त्यानुसार, बदवान गावातील घनश्याम धाकड या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांकडे मुख्यमंत्री चौहान यांनी १ कोटींचा धनादेश सुपूर्द केला आहे. आज चौहान हे पत्नी साधना यांच्यासोबत विशेष विमानाने बदवान गावात पोहोचले. त्यांनी धाकड कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे १ कोटींचा धनादेश सुपूर्द केला. शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही चौहान यांनी त्यांना दिले. दरम्यान, चौहान हे लोध, नायखेडा, पिपळ्यामंडी, बारखेडा पंथ आणि बुधा या गावांतील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत.

कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मंदसौरमध्ये दोन ठिकाणी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर आठ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात येत होता. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी संचारबंदी लागू केली होती. दरम्यान, राज्यात शांतता नांदावी, यासाठी मुख्यमंत्री चौहान शनिवारी उपोषणाला बसले होते. दुसऱ्याच दिवशी रविवारी मुख्यमंत्र्यांनी उपोषण मागे घेतले होते. उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांवर संकट ओढावले तेव्हा प्रत्येकवेळी मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो. मी एसीमध्ये बसून निर्णय घेणारा नेता नाही, तर मंत्रालयातून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाऊन निर्णय घेतले. म्हणूनच आज मंदसौरमधील पीडित कुटुंबियांनी माझी भेट घेऊन, उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच त्यांनी आपल्या गावी येण्याचं आमंत्रण ही दिलं आहे, असे चौहान यांनी सांगितले होते.