21 October 2019

News Flash

मंदसौर बलात्काराच्या घटनेवर राहुल गांधींनी व्यक्त केले दु:ख

मध्य प्रदेशात मंदसौर येथे आठवर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

मध्य प्रदेशात मंदसौर येथे आठवर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आपण आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी देश म्हणून एकत्र आले पाहिजे तसेच पीडित मुलीला न्याय मिळवून दिला पाहिजे असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे. मंदसौर बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात एकच संतापाचे वातावरण आहे.

या घटनेने दिल्लीतील ‘निर्भयाकांड’ प्रकरणाची आठवण करुन दिली असून नराधमांनी आठ वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी २० वर्षांच्या नराधमाला अटक केली आहे. मंदसौरमध्ये राहणारी आठ वर्षांची मुलगी मंगळवारी शाळेत गेली होती. ती दुसरी इयत्तेत शिकते. मंगळवारी संध्याकाळी तिचे आजोबा तिला घेण्यासाठी शाळेत गेले असता १५ मिनिटांपूर्वीच ती शाळेतून निघून गेल्याचे समजले.

कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच दिसत नव्हती. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनीही मुलीचा शोध सुरु केला. बुधवारी सकाळी दहा वाजता लक्ष्मण गेटजवळील झाडाझुडपात पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तिच्या बाजूला बीयरच्या बॉटलचे तुकडे होते. तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदौरमधील रुग्णालयात हलवण्यात आले.

First Published on June 30, 2018 1:46 pm

Web Title: madhya pradesh mandsaur gangrape