उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी नुकतेच महिलांनी जीन्स घालण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. यानंतर आता मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या उषा ठाकुर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. फाटके कपडे घालणं हा अपशकुन असतो असं ठाकुर यांनी म्हटलं आहे. संस्कृती आणि परंपरा मानणाऱ्यांना अशापद्धतीचे कपडे परिधान करणं आवडत नाही, असंही ठाकुर यांनी म्हटलं आहे. ठाकुर या मध्य प्रदेश सरकारमध्ये पर्यटन तसेच संस्कृतिक मंत्री आहे.

सोमवारी राज्याची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्ये एका मुलाखतीदरम्यान त्यांना कपड्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ठाकुर यांनी, माझं व्यक्तीगत मत तर हे आहे की फाटके कपडे घालणं हे भारतीय संस्कृतीप्रमाणे अपशकून मानलं जातं. ठाकुर या भोपाळमधील एका संग्रहलयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाटी आल्या होत्या. “तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की आपली आजीसुद्धा कापड थोडं तरी फाटलं असेल तर ते वापरु नको असं सांगायची. आईसुद्धा कापड थोडं फाटलं तरी आता हे वापरणं बंद कर, असा सल्ला द्यायची,” असा संदर्भही ठाकुर यांनी दिला.

नक्की वाचा >> “भगवान श्री राम आणि भगवान श्री कृष्णाप्रमाणे भविष्यात लोकं मोदींचीही पूजा करतील”

दोन आठड्यांपूर्वीच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तीरथ सिंह रावत यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं होतं. सध्याच्या तरुण पिढीमध्ये संस्कारांची कमतरता दिसून येत आहे. आजची तरुण मंडळी विचित्र फॅशन करताना दिसतात. गुडघ्या जवळ फाटलेल्या जीन्स घालून ते स्वत:ला मोठ्या बापाची पोरं असल्याचं दाखवतात. अशी फॅशन करण्यात आजकाल मुलीही मागे नसल्याचंही रावत म्हणाले होते.

नक्की वाचा >> “CM साहेब, जीन्स नाही तुमचा मेंदू फाटलाय”; महिला नेत्या तीरथ सिंह रावतांवर संतापल्या

रावत यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. भाजपाला विरोध करणाऱ्या अनेक पक्षातील महिला नेत्यांनी या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता. अनेक सेलिब्रिटींनाही रावत यांनी ज्या रिप्ट जीन्सवरुन टीका केली ती परिधान करुन सोशल नेटवर्किंगवर फोटो पोस्ट केले होते.