दत्तक घेतलेला पाच वर्षांचा मुलगा गोरा व्हावा यासाठी त्याला दगडाने घासणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पीडित मुलाची महिलेच्या घरातून सुटका करण्यात आली असून दगडाने घासल्याने त्या मुलाच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत.

भोपाळमधील शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या सुधा तिवारी यांनी उत्तराखंडमधील मातृछाया अनाथ आश्रमामधून दीड वर्षांपूर्वी एक मुलगा दत्तक घेतला. मुलाला घेऊन भोपाळला परतताच सुधा तिवारी यांनी मुलगा गोरा व्हावा, यासाठी त्याच्यावर अघोरी उपचार सुरु केले. एका व्यक्तीने त्यांना मुलाला काळ्या दगडाने दररोज घासण्याचा सल्ला दिला. सुधा यांनीही मुलाला होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत त्याला दगडाने घासले. यामुळे त्या मुलाच्या शरीरावर जखमा झाल्या. त्याच्या खांद्यावर, हातावर, पायावर आणि पाठीवर जखम झाली होती.

सुधा तिवारी यांच्या बहिणीची मुलगी शोभना शर्मा यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील केला. दगडाने घासल्याने मुलाला त्रास होतो, असे त्यांनी सुधा तिवारी यांना सांगितले. मात्र, यानंतरही प्रकार काही थांबेना. शेवटी मुलाच्या वेदना पाहवत नसल्याने शोभना यांनी लहान मुलांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थाच्या मदतीने पोलीस ठाणे गाठले.

पोलिसांनी सुधा तिवारी यांच्या घरातून मुलाची सुटका केली आहे. रुग्णालयातील उपचारानंतर त्याची रवानगी चाईल्ड लाइन सेंटर येथे करण्यात आले. या केंद्रात त्या मुलाचे समुपदेशन केले जाणार असून त्याला घरात आणखी काय त्रास झाला का, याची चौकशी केली जाईल.

मुलाला दत्तक देणारे मातृछाया हे अनाथआश्रमही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मातृछायाने मुलाला दत्तक दिल्यानंतर मुलाच्या घरी भेट दिली नव्हती, असे समोर आले आहे. सुधा यांनी मुलाला शाळेत देखील पाठवले नव्हते, असे समजते. या प्रकाराने खळबळ उडाली असून महिलेवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.